वर्ध्याच्या घटनेने मी दु:खी, पंतप्रधानांचं ट्विट; मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर
वर्धा येथे आज सकाळी झालेल्या भीषण आणि दुर्देवी अपघातात सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. हे सातही विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत होते. मृतांमध्ये आमदाराच्या एका मुलाचा समावेश आहे.
नवी दिल्ली: वर्धा (wardha) येथे आज सकाळी झालेल्या भीषण आणि दुर्देवी अपघातात ( accident)सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. हे सातही विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत होते. मृतांमध्ये आमदाराच्या एका मुलाचा समावेश आहे. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. या घटनेने मी अत्यंत दु:खी झालो आहे, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अपघातातील जखमींना बरे वाटावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रार्थनाही केली आहे. तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना पंतप्रधानांनी आर्थिक मदतही जाहीर केली आहे. मोदींनी दोन ट्विट करून या दुर्देवी घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. मोदींनी केलेले दोन्ही ट्विट मराठीत आहेत.
महाराष्ट्रात सेलुसरा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दुःखी झालो आहे. ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावले आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातातील जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख
पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून सेलूसरा जवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या अपघातात जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने यवतमाळला आले होते
वर्धा येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या ज्या सात विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यापैकी आविष्कार राहांगडाले हा विद्यार्थी मुळचा महाराष्ट्रातील तिरोडाचा आहे. तर इतर सहा विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरील आहेत. नीरज चौहान, गोरखपूर (उत्तर प्रदेश) नितेश सिंह, जुनाबागा (ओडीसा), विवेक नंदन, गया (बिहार) प्रत्यूष सिंह, गोरखपूर (उत्तर प्रदेश) शुभम जयस्वाल, दिनदयाल उपाध्याय नगर (उत्तर प्रदेश) आणि पवन शक्ती, गया (बिहार) मधील होते. हे विद्यार्थी काल आविष्कारचा हॉस्टेलमधील रूममेट पवन शक्ती या एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यवतमाळला गेले होते. परत येताना त्यांच्या गाडीला हा भीषण अपघात झाल्याची माहिती महाविद्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे यांनी दिली आहे.
अपघातात मृत्यू झालेल्या सात विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये राहत होते. तर नितेश सिंह हा विद्यार्थी वर्ध्यात खाजगी रूम करून राहत होता. ज्या महिंद्रा एक्सयुव्ही कारचा अपघात झाला आहे, ती नितेश सिंहच्या मालकीची होती. काल रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हॉस्टेलमध्ये राहणारे सहा विद्यार्थी परत न आल्यामुळं दहाच्या सुमारास हॉस्टेलच्या वॉर्डनने याची माहिती महाविद्यालय प्रशासनाला आणि नंतर या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिली होती. काही पालकांनी आमचे पाल्य आम्हाला सूचना देऊन मित्राच्या वाढदिवसासाठी बाहेर गेले आहेत, असें महाविद्यालय प्रशासनाला कळविलं होतं, अशी माहितीही अभ्युदय मेघे यांनी दिली आहे.
सर्व सातही विद्यार्थ्यांच्या पोस्टमार्टमची प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्वांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले आहेत. आविष्कार यांच्या वर गोंदिया जिल्याच्या तिरोडा तालुक्या अंतर्गत येणाऱ्या खमारी गावात अंत्य संस्कार करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात सेलुसरा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दुःखी झालो आहे. ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावले आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातातील जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो: पंतप्रधान @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 25, 2022
संबंधित बातम्या:
Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस कोरोना पॉझिटिव्ह
धनंजय मुंडेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, खोटी अॅट्रॉसिटी लावली, पंकजा मुंडेंचा घणाघात!