जबलपूर : राज्य आणि देशभरात लव्ह जिहादवरून भाजपसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून या संघटनांकडून आंदोलने आणि मोर्चेही काढले जात आहेत. तसेच धर्मांतर बंदी कायदा करून लव्ह जिहादच्या प्रकाराला आळा घालण्याचीही मागणी होत आहे. भाजपने तर काही राज्यात धर्मांतर बंदी कायदाही केला आहे. असं असतानाच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मात्र वेगळाच सूर आळवला आहे. त्यांनी प्रेम म्हणजे प्रेम असतं असं सांगून भाजपलाच एक प्रकारे घरचा आहेर दिला आहे. पंकजा मुंडे यांनी थेट आणि सामंजस्याची भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
पंकजा मुंडे या मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांना लव्ह जिहाद बाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली ठाम भूमिका व्यक्त केली. प्रेम हे प्रेम असतं. प्रेम कोणत्या भिंती पाहत नाही. प्रेमात कोणत्या भिंती नसतात, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. जर दोन लोक निर्मळपणे प्रेमाने एकत्र येत असतील तर त्याचा सन्मान केला पाहिजे. मात्र, त्यामागे काही कटुता किंवा चालबाजी असेल तर त्या प्रकाराला वेगळ्या पद्धतीने पाहिलं पाहिजे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी इंद्रेश कुमार हेही उपस्थित होते. त्यांनाही लव्ह जिहादच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रेमाच्या नावाने वासनेचा बाजार मांडला गेला आहे. प्रेमाला धुळीस मिळवलं जात आहे. प्रेमाच्या नावाखाली हत्या आणि धर्मांतर होत आहे. लोक याला लव्ह जिहाद म्हणत आहेत. प्रेमाच्या नावाने होणारी हिंसा आणि फसवणूक याचा आम्ही निषेध करतो, असं इंद्रेश कुमार म्हणाले.
#WATCH | “…I think love is love. Love sees no walls. If two people have come together purely out of love, it should be respected. But if there is some bitterness and artifice behind it, it should be seen differently,” says BJP national secretary Pankaja Munde on ‘Love Jihad’,… pic.twitter.com/xj4v4yU6xM
— ANI (@ANI) June 11, 2023
प्रेम हा सुपर विचार आहे. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मुलगा आणि मुलगी चार वाजेपर्यंत गप्पा मारतात आणि आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नसल्याचं सांगतात. मध्ये मग असं काही होतं की मुलीची हत्या होते. मग हे प्रेम आहे की वासना? देशाने आता यावर विचार करण्याची वेळ आली आहे, असंही इंद्रेश कुमार म्हणाले.
मुलगा आणि मुलीचं प्रेम होतं. मग ते कोणत्याही जातीचे असोत. परंतु प्रेम झाल्यावर खरं सत्य बाहेर येतं. मुलाची खरी ओळख काही औरच असल्याचं दिसून येतं. अशा पद्धतीने फसवणूक करून प्रेम करणं किती योग्य आहे? याला प्रेम म्हणायचं? वासना म्हणायची की फ्रॉड?, असा सवाल त्यांनी केला.