लोकसभेत नवनीत राणा, गिरीश बापट आक्रमक; ठाकरे सरकारच्या बचावासाठी पंजाबचा खासदार मैदानात
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बचा आज लोकसभेतही धमाका झाला. या मुद्द्यावरून शिवसेना-भाजप आमने सामने आले. (bjp raised parambir singh letter issue in parliament)
मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बचा आज लोकसभेतही धमाका झाला. या मुद्द्यावरून शिवसेना-भाजप आमने सामने आले. सिंग यांचे आरोप गंभीर असून महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी भाजपने केली. तर, ठाकरे सरकाच्या बचावासाठी पंजाबच्या काँग्रेस खासदाराने जोरदार बॅटिंग करत भाजपला जशास तसे प्रत्युत्तर दिलं. (bjp raised parambir singh letter issue in parliament)
लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर शून्य प्रहारात भाजपने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरून जोरदार आवाज उठवला. भाजपचे खासदार गिरीश बापट, पूनम महाजन आणि अपक्ष खासदार नवनीत राणा हे लोकसभेत आक्रमक झाले. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी उडाल्याने सभागृहात गदारोळ झाला. यावेळी भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. सत्ताधाऱ्यांकडून पोलीस अधिकाऱ्यांना खंडणी वसुलीचं टार्गेट दिलं जात आहे. पोलीसच खंडणी मागत असून त्यांना मंत्र्यांचा आशार्वाद आहे. अशावेळी जनतेने कुणाकडे पाह्यचे, असं सांगतानाच हे प्रकरण अत्यंत गंभीर असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी गिरीश बापट यांनी केली. गिरीश बापट यांनी लोकसभेत संपूर्ण भाषण मराठीत करत ही मागणी केली.
खंडणी वसुलीसाठी मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद
महाराष्ट्रात कुंपनच शेत खात आहे. पाण्याला तहान लागली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा आणि गुन्हेगारांना अटक करा. पोलीस खंडणी मागत आहेत. त्यांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा आशीर्वाद आहे, असा आरोप बापट यांनी केली.
जो व्यक्ती सोळा वर्ष निलंबित होता. त्याला पुन्हा सेवेत का घेतलं? कुणी घेतलं?, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना पोलीस दलात घ्यायला नकार दिला होता. शिवसेनेने वाझेंसाठी फडणवीसांवर दबाव आणला होता, असं सांगतानाच हा प्रकार असाच सुरू राहिला तर संपूर्ण देशात खंडणी वसुलीचा पायंडा पडेल, असंही राणा म्हणाल्या.
ठाकरे सरकार वसुली सरकार
भाजप नेत्या पूनम महाजन यांनीही ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्यातील ठाकरे सरकार हे तीन चाकी सरकार आहे. या सरकारचा एकमेकांशी पायपोस नाही. एका पोलीस अधिकाऱ्याला 100 कोटी वसूल करण्याचा टार्गेट दिला जातो. तर पाच वर्षात सहा हजार कोटी वसूल केली जातील. एका व्यक्तीला एवढा टार्गेट तर बाकीच्यांना किती असेल, असा सवाल त्यांनी केला. याप्रकरणात राष्ट्रवादीचे गृहमंत्री असताना शिवसेनेला मिर्ची लागण्याचं कारण काय? असा चिमटाही महाजन यांनी काढला.
पंजाबचा खासदार ठाकरे सरकारच्या मदतीला धावला
दरम्यान, यावेली पंजाबचे काँग्रेसचे खासदार रवनीत सिंग हे ठाकरे सरकारच्या मदतीसाठी धावले. त्यांनी ठाकरे सरकारच्या बाजूने लोकसभेत जोरदार बॅटिंग केली. भाजपकडून महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचं काम सुरू केलं आहे. बाहेरचे लोक महाराष्ट्रात ढवळाढवळ करत आहेत. त्यांनी महाराष्ट्रात नाक खुपसू नये, असं सांगत सिंग यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
सरकार पाडण्याचे प्रयत्न
यावेळी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यापासूनच राज्य सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सुरू असून या चौकशीतून सत्यबाहेर येईल, असं राऊत म्हणाले. (bjp raised parambir singh letter issue in parliament)
राज्यसभेतही गदारोळ
लोकसभेतच नव्हे तर परमबीर सिंग प्रकरणावर राज्यसभेतही गदारोळ निर्माण झाला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर टीका केली. गृहमंत्रीच वसुली करत असून संपूर्ण देश हे पाहत आहेत, असं जावडेकर म्हणाले. जावडेकर यांनी ट्विट करून महाविकास आघाडीकडून जनतेला धोका असल्याचं खोचक ट्विटही केलं आहे. (bjp raised parambir singh letter issue in parliament)
VIDEO : SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 22 March 2021https://t.co/dmhkh0Ca87
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 22, 2021
संबंधित बातम्या:
अनिल देशमुखांचं करायचं काय?; मुख्यमंत्र्यांसमोर ‘हे’ 5 पर्याय!
भाजपचे नेते राज्यपालांकडे जाणार, राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली? ‘नाराज’ पोलीस अधिकाऱ्यांना घातली साद
(bjp raised parambir singh letter issue in parliament)