पणजी: उत्तराखंड, कर्नाटक, गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता भाजपा गोव्यातही तशीच खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना हटवून त्यांच्या जागी नवा मुख्यमंत्री केली जाण्याची शक्यता दिल्लीतल्या वर्तूळात वर्तवली जातेय. आज प्रमोद सावंत यांना तातडीनं दिल्लीला बोलवण्यात आलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. त्याच बैठकीत गोव्याचा मुख्यमंत्री बदलला जाण्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
गोव्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात. सध्या काठावरच्या पाठिंब्यावर गोव्यात भाजपचा मुख्यमंत्री आहे. आगामी विधानसभेत थोड्या जरी जागांचा फटका बसला तर भाजपच्या हातातून गोव्यासारखं महत्वाचं राज्य जाऊ शकतं. त्यातच गोव्यात टीएमसी सक्रिय झालीय. केजरीवालांची आपही कामाला लागलीय. टीएमसीनं तर एक माजी मुख्यमंत्रीच गळाला लावलाय. त्यामुळे सुशेगात गोव्यात अचानक मुख्यमंत्री बदलला जाऊ शकतो असं दिसतंय. दिल्लीत ह्याच बदलांवर शहा-नड्डा-फडणवीस-सावंत अशी बैठक पार पडली.
प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवलं तर त्यांच्या जागी कोण हेही तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळेच विश्वजीत राणे आणि चंद्रकांत(बाबू) कवळेकर यांची नावं चर्चेत आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी ह्या दोन नावांवर चर्चा झाल्याचं समजतं. दोघांपैकी एकाला गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची कमान मिळाली तर आश्चर्य वाटू नये.
विश्वजीत प्रतापसिंह राणे हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंचे सुपूत्र आहेत. 2017 साली त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपात दाखल झाले. त्यानंतर पर्रिकरांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री होते. गोव्याचे आरोग्य मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. विश्वजीत राणेंचा जन्म मुंबईचा पण त्यांचं शिक्षण हे पणजीचं.
चंद्रकांत (बाबू) कवळेकर हे सध्याचे गोव्याचे उपमुख्यमंत्री आहेत. ते केपे विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात. कवळेकरही मुळचे भाजपवासी नाहीत. 2017 ला कवळेकर हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडूण आले होते आणि त्यांनी भाजपच्याच उमेदवाराचा पराभव केला होता. कवळेकरांच्या मोबाईलवरून अश्लिल व्हिडीओ पाठवलं गेल्याचं प्रकरण काही काळापूर्वी गाजलेलं होतं. आपण झोपेत असताना, कुणी तरी मोबाईलशी छेडछाड करुन अश्लिल क्लिप पाठवल्याची तक्रार कवळेकरांनी पोलीसात दिली होती.
हे ही वाचा:
एखाद्या वाहनाच्या चार्जिंगला चार तास लागले तर इतरांनी झोपा काढायच्या का?; अजितदादांचा सवाल
‘थोडी चाड शिल्लक असेल तर नवाब मलिकांचा राजीनामा घ्या’ राधाकृष्ण विखे यांचा घणाघात
(BJP to change Goa CM? Meeting at Shah’s house, discussion on two possible names of the Chief Minister)