इंडिया आघाडीला भाजपचा मोठा शह, जेडीएसशी युती?; कर्नाटकातून राजकीय समीकरणं बदलाची नांदी?
कर्नाटकातील मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. इंडिया आघाडी आणि एनडीए आपली ताकद वाढवण्यावर जोर देत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या पक्षांना आपल्या गळाला लावलं जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर...
बंगळुरू | 9 सप्टेंबर 2023 : कर्नाटकात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेसच्या एका मित्र पक्षाने थेट भाजपशी हातमिळवणी केल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेससाठी आणि पर्यायाने इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांच्या जनता दल सेक्यूलर (जेडीएस) आणि भाजपमध्ये युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही मुद्द्यांवर या दोन्ही पक्षांचं एकमत झालं असून केव्हाही युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजप आणि जेडीएसच्या युतीमुळे कर्नाटकातील राजकीय समीकरणे बदलणार असून काँग्रेससाठी ही युती डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे इंडिया आघाडीकडून देशभरात विरोधकांची मोट बांधली जात असतानाच जेडीएसने भाजपशी युती केल्याने इंडिया आघाडीसाठीही हा मोठा फटका असल्याचं मानलं जात आहे.
एनडीए आणि इंडिया आघाडी या दोन्ही आघाड्यांकडून आपली ताकद वाढवण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी दोन्ही आघाड्यांकडून इतर पक्षांना सोबत घेण्यावर भर दिला जात आहे. असं असतानाच आता जेडीएसने भाजपसोबत युती केल्याने भाजपची ताकद आणखी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या दोन्ही पक्षाच्या युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यात आहे. भाजपचे नेते बीएस येडीयूरप्पा यांनीही या युतीला दुजोरा दिला आहे. एचडी देवगौडा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. त्यांच्यात चार जागांवर फायनल चर्चा झाली आहे, असं येडीयूरप्पा यांनी स्पष्ट केलं आहे.
भेटीगाठींवर जोर
कर्नाटकात काँग्रेसची सरकार आहे. पण भाजपला 2019 सारखीच 2024मध्ये कामगिरी करायची आहे. त्यामुळेच भाजपने जेडीएसशी युतीची चर्चा सुरू केली आहे. काही मुद्द्यांवर त्यांचं एकमतही झालं आहे. जागांवरही एकमत झालं आहे. देवगौडा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊन युतीवर चर्चाही केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कुटुंब लढलेल्या जागा हव्या
यावर भाजप नेते येडियूरप्पा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवगौडा यांनी पंतप्रधानांची भेट घेतली याचा मला आनंद वाटतो. दोघांमध्ये लोकसभेच्या चार जागांवर एकमत झालं आहे. मी या चर्चेचं स्वागत करतो, असं येडीयूरप्पा म्हणाले. जेडीएसला भाजपकडून मांड्या, हासन, तुमाकुरू, चिकबल्लापूर आणि बेंगळुरू ग्रामीण या पाच जागा हव्या असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे जेडीएसने ज्या पाच जागा मागितल्या आहेत. त्यातील चार जागांवर देवगौडा यांच्या कुटुंबातील कोण ना कोण तरी निवडणुकीत उभा राहिलेला आहे.
काय समीकरणे बदलणार?
जेडीएस आणि भाजप एकत्र आल्यावर दक्षिण भारतातील केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक समीकरणेही बदलणार आहेत. कर्नाटकात लिंगायत समाजाची 17 टक्के वोट आहेत. हे भाजपचे मतदार आहेत. येडीयूरप्पा हे लिंगायत समाजातील असून त्यांचा या समाजावर मोठा प्रभाव आहे. त्यानंतर राज्यात वोक्कालिगा समाजाची 15 टक्के मते आहे. राज्यातील हा दुसरा सर्वाधिक मतदारसंख्या असलेला समाज आहे. वोक्कालिगा समाज हा पारंपारिकरित्या भाजपचा मतदार मानला जातो.
स्वत: देवगौडा हे वोक्कालिगा समाजातून येतात. अशावेळी जेडीएस आणि भाजप एकत्र आल्यास दोन्ही पक्षाची मतांची टक्केवारी 32 टक्के होईल. त्यामुळे काँग्रेसला आणि पर्यायाने इंडिया आघाडीला मोठा फटका बसेल. मात्र, युती झाली तरी दोन्ही समाज एकमेकांना आपली मते किती वर्ग करतील याची शाश्वती कमी आहे. मात्र, प्रादेशिक राजकारणाची गणितं पाहिलं तर भाजपला या युतीचा फायदाच होणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीत जेडीएसची व्होट बँक घटली होती. पण असं असलं तरी जेडीएसला गेल्या निवडणुकीत 10 टक्के मते मिळाली होती. त्यामुळे जेडीएसची ही 10 टक्के मतेही भाजपसाठी राज्यात गेम फिरवण्यासाठी महत्त्वाची ठरू शकतात असं जाणकार सांगतात.