तडजोड नाहीच… लोकसभा अध्यक्षपद भाजपकडेच राहणार?; लोकसभेचं उपाध्यक्षपद मात्र…
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी थांबली. त्यानंतर केंद्रात मोदी सरकार आलं. केंद्रातील मंत्र्यांचे खाते वाटपही झाले आहे. तसेच मंत्र्यांनी पदभारही स्वीकारला आहे. आता संसदेचं अधिवेशन होणार आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मात्र, भाजपला लोकसभेचं अध्यक्षपद हवं आहे. एनडीएतील घटक पक्षांनाही अध्यक्षपद हवं आहे.
केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर मित्र पक्षांसमोर गुडघे टेकायचे नाही हे भाजपने स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे तुम्ही आघाडीचा धर्म पाळा असा संदेशच भाजपने दिला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचं वर्चस्व दिसून आलं आहे. आता लोकसभा अध्यक्षपदाबाबतही भाजपने आपला रोख स्पष्ट केला आहे. भाजपला लोकसभा अध्यक्षपदाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. मात्र, एनडीएतील घटक पक्षाला लोकसभेचं उपाध्यक्षपद मिळू शकतं. तसे संकेतही मिळत आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्षपद नीतीश कुमार यांच्या पक्षाकडे जाणार की चंद्राबाबू नायडू यांच्या हा मुद्दाच निकाली निघाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप आपल्याकडेच लोकसभेचं अध्यक्षपद ठेवणार आहे. उपाध्यक्षपद एनडीएतील घटक पक्षाला देणार आहे. एनडीएच्या सर्व घटक पक्षांशी बोलून ते ठरवलं जाणार आहे. एनडीएत कुणाला उपाध्यक्षपद द्यायचं आणि कोण उपाध्यक्षपदाचा उमेदवार असेल याचं नाव ठरवण्याची जबाबदारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर देण्यात आली आहे.
बैठकीत काय चर्चा?
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या घरी रविवारी बैठक झाली होती. या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, किरण रिजिजू, जेडीयू नेते ललन सिंह आणि चिराग पासवान उपस्थित होते. या बैठकीत 18व्या लोकसभेचं पावसाळी अधिवेशन, लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड यावर चर्चा झाली.
ओम बिर्ला यांच्यानंतर कोण?
लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर एनडीएने सरकार स्थापन केलं आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत. कॅबिनेट मंत्र्यांचं खातेवाटपही झालं आहे. आता लोकसभा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा रंगली आहे. भाजपने मागच्या सरकारमध्ये ओम बिर्ला यांना लोकसभेचं अध्यक्षपद दिलं होतं. परंतु, आता या नव्या संसदेतही लोकसभा अध्यक्षपदाची चर्चा सुरू आहे.
तर उमेदवार देऊ
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेचं आठ दिवसाचं विशेष अधिवेशन 3 जुलैपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात 24 आणि 25 जून रोजी नव्या खासदारांचा शपथविधी पार पडू शकतो. तर 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकते. एकीकडे भाजपने लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार ठरवण्यासाठी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनीही दंड थोपाटले आहे. आम्हाला लोकसभेचं उपाध्यक्षपद नाही दिलं तर आम्ही लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देऊ. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक होणारच असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.