राहुल गांधी मर्द आहेत तर अमेठीतून… काँग्रेस नेत्याच्या ‘त्या’ विधानावरून राहुल गांधी भाजपच्या निशाण्यावर
वादग्रस्त विधानाचे पडसाद उमटल्यानंतर अजय राय यांनी सारवासारव केली आहे. त्यात अश्लील काहीच नाही. हा बोलीभाषेतील एक सामान्य शब्द आहे. कुणाचाही अवमान करण्याचा माझा हेतू नव्हता.
नवी दिल्ली: काँग्रेस नेते अजय राय यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केलं आहे. राय यांच्या या विधानाचे प्रचंड पडसाद उमटत आहेत. भाजपचा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरच निशाणा साधला आहे. राहुल गांधी जर मर्द आहेत तर त्यांनी 2024मध्ये अमेठीतून निवडणूक लढण्याची जाहीरपणाणे घोषणा करावी. त्यांनी अजय रायसारख्या नेत्यांच्या मागे लपून राहू नये, अशी टीकाच अमित मालवीय यांनी केली.
स्मृती ईराणी अमेठीत केवळ लटके झटके करतात आणि निघून जातात. हा मतदारसंघ गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला आहे, असं विधान अजय राय यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर भाजप नेत्यांनी काँग्रेस नेत्यांवर जोरदार पलटवार केला आहे. एवढेच नव्हे तर अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांना 2024मध्ये अमेठीतून लढण्याचं खुलं आव्हानच दिलं आहे. तर राष्ट्रीय महिला आयोगाने या विधानाची दखल घेतली असून राय यांना नोटीस बजावली आहे. तर भाजपच्या महिला मोर्चाने राय यांच्या विरोधात उत्तर प्रदेशात पोलीस तक्रार केली आहे.
दरम्यान, वादग्रस्त विधानाचे पडसाद उमटल्यानंतर अजय राय यांनी सारवासारव केली आहे. त्यात अश्लील काहीच नाही. हा बोलीभाषेतील एक सामान्य शब्द आहे. कुणाचाही अवमान करण्याचा माझा हेतू नव्हता. ही आमची बोलीभाषा आहे. त्याचा अर्थ कोणी तरी अचानक प्रकट होतो. काही तरी बोलतो आणि पुन्हा गायब होतो, असा आहे, असं त्यांनी सांगितलं.
राय यांनी सारवासारव केली असली तरी स्मृती ईराणी यांनी मात्र राय यांना फटकारलं आहे. लटके झटके ही काही म्हण नाहीये. त्यातून काँग्रेसची संस्कृतीच दिसून येते. आपल्या संस्कृतीत, आपल्या सभ्यतेत महिलांवर अभद्र शेरेबाजी केली जात नाही. ही काँग्रेसची राजकीय संस्कृती असू शकते. पण ही काशीची संस्कृती निश्चितच नाही, अशी टीका स्मृती ईराणी यांनी केली.
गांधी कुटुंबाला अशी अभद्र भाषा आवडत असेल तर काँग्रेस नेते अशी भाषा वापरल्यानंतर माफी मागणार नाहीत. अशा पद्धतीने विधाने करणाऱ्यांना गांधी कुटुंब एक प्रकारे बळच देत आहे. त्यामुळे ही गांधी कुटुंबाचीच संस्कृती असावी.
सामान्य राजकीय कार्यकर्तेही अशा प्रकारच्या भाषेचा वापर करत नाहीत. मात्र, गांधी कुटुंबाला अशी भाषा आवडेल असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना का वाटत असावं? असा सवालही त्यांनी केला.