पंतप्रधान मोदींच्या 71 व्या वाढदिवसासाठी भाजपचा मास्टरप्लॅन तयार, अभियानातले 11 मोठे मुद्दे
मोदींचा फोटो असलेल्या राशन बॅग ज्यावेळेस गरीब घरात जातील त्यावेळेस गरीबांचा मसिहा ही मोदींची प्रतिमा आणखी मजबूत होईल असा विश्वासही व्यक्त केला गेलाय. ह्या सगळ्या अभियानातून भाजपला आणखी बळकट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी 71 वा वाढदिवस साजरा करतायत. विशेष म्हणजे त्याच्या पुढच्याच महिन्यात म्हणजे 7 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी प्रशासनात 20 वर्ष पूर्ण करतायत. याचाच अर्थ भाजपसाठी हा डबलधमाका आहे. याच पार्श्वभूमीवर मोदींचा राजकीय प्रवास आणि त्यांचं यश साजरं करण्यासाठी भाजपानं तीन आठवड्यांचं एक मोठं अभियान हाती घेतलंय. हे अभियान देशभर राबवलं जाणार असून भाजपला आणखी मजबूत करण्यासाठी बूथ लेवलपर्यंत प्रयत्न केले जाणार आहेत.
काय आहे नेमकं अभियान? इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या बातमीनुसार- भाजपाकडून 14 कोटी राशन बॅग वाटण्यात येणार आहेत. तसच देशभरातल्या बूथावरून थँक्यू मोदी जी लिहिलेले 5 कोटी पोस्टकार्ड पाठवले जाणार आहेत. 71 जागी नद्यांची साफसफाईचा कार्यक्रम आखला जाणार आहे. तसच सोशल मीडिया कँपेन, वॅक्सिनेशन व्हिडीओ, मोदींचं आयुष्य आणि काम यावर ठिकठिकाणी सेमीनार भरवले जाणार आहेत. हे सगळं मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा भाग असेल. तीन आठवड्यापर्यंत कार्यक्रम चालणार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना पक्षानं आदेश दिलाय की, गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबर ते दीनदयाल उपाध्याय जयंती म्हणजेच 25 सप्टेंबर दरम्यान कार्यकर्त्यांनी कुठलं ना कुठलं सामाजिक कार्य करावं. गेल्या वर्षी पक्षानं ‘सेवा सप्ताह’ चालवला होता. यावेळेस ‘सेवा आणि समर्पण’ अभियान असं नाव दिलं गेलंय.
अभियानाचा उद्देश काय? मोदी आणि त्यांच्या सरकारनं विविध क्षेत्रात जे यश मिळवलय ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या अभियानाद्वारे केला जाईल. पण हे करण्यामागे कुठला राजकीय हेतू नसेल कसं काय? कोरोनाकाळात मोदी सरकारवर मोठी टिका झाली, आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोदींना टिकेला सामोरं जावं लागलं. त्यावर पडदा पाडत पुढच्या वर्षी पाच राज्यात विधानसभा निवडणुका होतायत, त्याचीच ही तयारी असल्याचा आरोप आताच विरोधक करतायत. पाच राज्यांमध्ये उत्तर प्रदेशचाही समावेश आहे जे भाजपसाठी सर्वात महत्वाचं राज्य आहे. तिथेही ह्या अभियानाचा राजकीय फायदा करुन घेण्याचा प्रयत्न केला जाईल. मोदी सरकारनं मोफत वॅक्सिनेशन केलं. तेही हायलाईट केलं जाणार आहे.
भाजपचं ‘सेवा आणि समर्पण अभियान’
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी अलिकडेच एका बैठकीत हे अभियान कसं असेल हे सांगितलं होतं. त्यातले प्रमुख मुद्दे असे-
1.पंतप्रधान मोदींचा फोटो असलेल्या 14 कोटी राशन बॅग वाटण्यात येतील. यात पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत 5 किलो राशन ह्या बॅगेत असेल. विशेष म्हणजे भाजपशासित राज्यात आतापर्यंत 2.16 कोटी बॅग वाटण्यात आल्यात.
2. कोरोना महामारीच्या काळात मोदींची मदत झाली, त्यामुळे त्यांना धन्यवाद देणारे व्हिडीओ दाखवले जाणार. यात गरीबांचे मसिहा मोदीजी असा संदेश असेल.
3. देशभरातून बूथ लेवलवरुन थँक्यू मोदीजी असं लिहिलेलं 5 कोटी पोस्टकार्ड त्यांना पाठवले जातील.
4. मोदींचा हा 71 वाढदिवस आहे, त्यामुळे 71 ठिकाणी नद्यांची साफसफाई अभियान राबवलं जाईल.
5. ज्यांना कोरोनाची लस दिली गेलीय, त्यांनी थॅक्यू मोदीजी म्हटलेले व्हिडीओ प्रसारीत केले जातील.
6.मोदींच्या राजकीय प्रवासावर व्हिडीओ दाखवला जाईल. राज्य आणि जिल्हा स्तरावर मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल. सेमिनारही असतील.
7. प्रसिद्ध लेखक, कवी यांच्याकडून मोदींची स्तुती करणारं साहित्य उपलब्ध केलं जाईल. यात प्रादेशिक भाषेतले लेखकही असतील.
8. कोरोनाकाळात जी मुलं अनाथ झालीत, त्यांना पीएम केअर फंडातून मदत देण्यासाठी नोंदणी अभियान चालवलं जाईल.
9. पंतप्रधान मोदींना अनेक सन्मानचिन्हं आणि प्रतिमा मिळालेल्या आहेत, त्याच्या निलामीबद्दल लोकांना सांगितलं जाईल.
10. वृद्धांना भोजन वाटप, त्यांच्या प्रकृतीची मोफत तपासणी, ब्लड डोनेशन कँप याचेही आयोजन केलं जाईल.
11. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती तर 25 सप्टेंबरला दीनदयाल उपाध्याय जयंती आहे. भाजप कार्यकर्त्यांना बूथ लेव्हलवर ह्या दोन दिवशी रचनात्मक कार्य करायला सांगितलं जाईल.
मोदी प्रतिमा आणखी मजबूत इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार- अरुणसिंह यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना सांगितलं की, त्यांनी जवळच्याच कोरोना लसीकरण केंद्रावर जावं आणि लोकांना धन्यवाद मोदीजी असं कार्ड पाठवायला प्रोत्साहित करावं. मोदींचा फोटो असलेल्या राशन बॅग ज्यावेळेस गरीब घरात जातील त्यावेळेस गरीबांचा मसिहा ही मोदींची प्रतिमा आणखी मजबूत होईल असा विश्वासही व्यक्त केला गेलाय. ह्या सगळ्या अभियानातून भाजपला आणखी बळकट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
Aai Kuthe Kay Karte | अनिरुद्ध पुन्हा अरुंधतीकडे जाणार, संजना देशमुखांच्या घरात एकटी पडणार?
दुष्काळात तेरावा : पावसाचा परिणाम सोयाबीनच्या दरावरही होणार, शेतकऱ्यांच्या अडचणी कायम
एसबीआय अलर्ट! आता एटीएममधून फाटकी किंवा खराब नोट निघाल्यास लगेच करा हे काम