लुधियानाच्या जिल्हा सत्र न्यायालयात स्फोट; एकाचा मृत्यू, चार जखमी
लुधियानाच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात गुरुवारी दुपारी मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात एक जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. बॉम्बमुळे हा स्फोट झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

लुधियाना : लुधियानाच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात गुरुवारी दुपारी मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात एक जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. बॉम्बमुळे हा स्फोट झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. बॉम्बमुळे हा स्फोट झाल्याचा दावा करण्यात येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान जरी हा बॉम्बस्फोट असल्याचा दावा करण्यात येत असला, तरीही अद्याप हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होऊ शकले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे . घटनेचा तपास सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितले.
इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर स्फोट
इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील वॉशरूममध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटामध्ये इमारतीचे नुकसान झाले आहे. खिडक्यांच्या काचाला तडा गेला, तसेच बाथरूमच्या भिंती देखील कोसळल्या आहेत. स्फोटानंतर घटनास्थळावरून बराचवेळा धूर निघत होता. घटनेची माहिती मिळताच न्यायालय परिसरात बघ्यांनी गर्दी केली होती. बॉम्बमुळेच हा स्फोट झाल्याचा दावा तिथे घटनेवेळी उपस्थित असलेल्या एका वकिलाने केला आहे. भर दुपारी स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे.
पोलीस घटनास्थळी हजर
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धावा घेतली, तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या देखील दाखल झाल्या. या स्फोटामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. पोलीस बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली आहे. दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी देखील घटनेची माहिती घेतली असून, दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
VIDEO : Yavatmal | यवतमाळमधील तरुणाचं मोदींना लग्नाचं निमंत्रण, मोदींनी दिल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद
Nagpur Crime | अनैतिक संबंधाचा संशय, खून करून अपघाताचा बनाव; 14 वर्षांनंतर उकलले गूढ
ओबीसींसाठी वंचितची विधानभवनावर धडक, कार्यकर्त्यांची धरपकड, आंबेडकर आक्रमक, म्हणाले…