“येत्या काळात मोदींजींचा विजयीरथ येणारच”; चार्जशीटवर मात्र ब्रिजभूषण यांचे मौन…
देशात सध्या मोदी लाट सुरू असून देशातील जनता देशाची प्रगती स्वतःच्या डोळ्यांनी पाहत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गोंडा : महिला कुस्तीपटूंवर लैंगिक शोषण प्रकरणी वादात अडकलेल्या ब्रिजभूषण सिंह आता दुसऱ्याच एका प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर ते पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आले. तर यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, विरोधक कितीही एकत्र आले तरी 2024 मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच विजयी रथ कोणीही रोखू शकणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळीही लोकसभा निवडणूक लढवण्याचा दावा करत त्यांनी सांगितले की, 2014 आणि 2019 मध्ये जशी विरोधकांनी एकजूट बांधली होती, तशीच यावेळीही आहे. मात्र आता पुन्हा एकदा भाजप सरकार स्थापने होण्याबाबत कोणतीही शंका नाही असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र सोपवण्याच् सवालावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही मात्र ते समर्थकांसह तातडीने कार्यक्रमातून निघून गेले. गोंडाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह हे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत.
आरोपपत्र दाखल
त्यांच्यावर यापूर्वी महिला कुस्तीपटूंनी विनयभंग आणि लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यामुळे या प्रकरणी कुस्तीपटूंकडून यावर सतत आवाज उठवला जात आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून गेल्या आठवड्यात आरोपपत्र दाखल केले आहे.
कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण
त्यामुळे दोनपैकी एका प्रकरणात, ज्यामध्ये अल्पवयीन कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता, त्या प्रकरणात त्यांना दिल्ली पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. पण दुसऱ्या प्रकरणात पोलिसांनी पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांसह पटियाला हाऊस कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे.
सर्व जागांवर विजयी
या आरोपपत्रानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मीडियासमोर मोदी सरकारचे कौतुक केले. त्यांचा पक्ष उत्तर प्रदेशातील सर्व 80 जागांवर निवडणूक लढवणार असून या सर्व जागांवर ते विजयीही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात मोदी लाट
देशात सध्या मोदी लाट सुरू असून देशातील जनता देशाची प्रगती स्वतःच्या डोळ्यांनी पाहत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जेव्हा अमेरिकेसारखी आर्थिक शक्ती आर्थिक दबावाखाली आली होती, अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शीपणामुळे देशावर कोणतेही संकट आले नाही असंही त्यांनी सांगितले.