Brijbhushan Singh : ‘माफी मागत नाहीत तोपर्यंत उत्तर प्रदेशात पाऊल ठेवू देणार नाही’, राज ठाकरेंच्या सभेनंतरही बृजभूषण सिंह मतावर ठाम
उत्तर प्रदेशच्या जनतेची माफी मागू शकत नसाल तर मग साधू संतांची माफी मागा, मोदींची माफी मागा, असंही मी बोललो. त्यानंतर योगींची माफी मागण्यासही सांगितलं. ते आज मुख्यमंत्री आहेत, पण ते महंत आहेत. अयोध्या आंदोलनात ते सहभागी होते, असं बृजभूषण सिंह म्हणाले.
नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करणारे बृजभूषण सिंह राज यांच्या सभेनंतरही आपल्या मतावर ठाम आहेत. ही राज ठाकरे यांची धार्मिक यात्रा नाही, तर राजकीय यात्रा आहे. श्रीरामाचं दर्शन करायला यायचं असेल तर माफी मागा, असं मी बोललो. माफी मागत नाहीत तोपर्यंत इकडे पाय ठेवू देणार नाही. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) जनतेची माफी मागू शकत नसाल तर मग साधू संतांची माफी मागा, मोदींची माफी मागा, असंही मी बोललो. त्यानंतर योगींची माफी मागण्यासही सांगितलं. ते आज मुख्यमंत्री आहेत, पण ते महंत आहेत. अयोध्या आंदोलनात ते सहभागी होते, असं बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) म्हणाले.
‘राज ठाकरे हे झारखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणाचे अपराधी’
योगीजी आज मुख्यमंत्री आहेत. ते आधी संत आहेत. तरी माफी मागितली नाही. राज यांची ही धार्मिक नाही तर राजकीय यात्रा आहे. उत्तर प्रदेशातील साधूंनी छत्रपती शिवाजी महाराजांना साधूच्या वेशात महाराष्ट्रात पोहोचवलं. मुंबई आणि उत्तर प्रदेशचं मोठं नातं आहे. आमचं मराठी लोकांवर प्रेम आहे, मराठ्यांवर प्रेम आहे. राज ठाकरे अयोध्येला येणार मला जमजले होते. मी 2008 पासून क्षण शोधत होतो की दोन दोन हात करायला मिळतील. आजही मुंबईत काही लोक मजबुतीने राहतात. राज ठाकरेंमध्ये हिंमत नाही त्यांना बाहेर काढायची. राज ठाकरे हे झारखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणाचे अपराधी आहेत, अशी घणाघाती टीकाही बृजभूषण सिंह यांनी केलीय.
हा सापळा आहे, अयोध्या दौऱ्याला विरोध का? – राज ठाकरे
राज ठाकरे यांनी आपला 5 जूनचा अयोध्या दौरा स्थगित केलाय. पुण्यातील सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी हट्टाने गेलो असतो. महाराष्ट्रातील सैनिक हिंदू बांधव आले असते. तिथे जर काही झालं असतं. आपली पोरं तर गेली असती अंगावर, तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. तुम्हाला तुरुंगात सडवलं गेलं असतं. हकनाक कारण नसताना केसेसचा ससेमिरा लावला असता. मी बाळा नांदगावकर आणि सरदेसाईंना सांगितलं आपल्या पोरांना हकनाक घालवणार नाही. सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांवर केसेस टाकल्या असत्या. ऐन निवडणुकीच्यावेळी हे झालं असतं. तेव्हा इथे कोणीच नसतं हा सर्व ट्रॅप होता, असा आरोप त्यांनी केलाय. एक खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य आहे का ? या गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत. काही तर तुम्हाला सांगता येणार नाही, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.