बी. एस. येदियुरप्पा चौथ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री
भाजप नेते बी. एस. येदियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी शुक्रवारी सायंकाळी चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना (BS Yediyurappa) पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. येदियुरप्पा यांना 31 जुलैपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
बंगळुरु : कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएस यांचं सरकार पडल्यानंतर दोन दिवसात भाजपने सत्ता स्थापन केली आहे. भाजप नेते बी. एस. येदियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी शुक्रवारी सायंकाळी चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना (BS Yediyurappa) पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. येदियुरप्पा यांना 31 जुलैपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे त्यांना दोनच दिवसात राजीनामा द्यावा लागला होता. 105 आमदारांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. पण काँग्रेस आणि जेडीएसने एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं होतं.
कर्नाटक विधानसभेत एका नामांकीत सदस्यासह एकूण 225 आमदार आहेत. यापैकी एका अपक्षासह काँग्रेसच्या दोन आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र घोषित केलंय, ज्यामुळे विधानसभेचं संख्याबळ आता 222 झालं. काँग्रेस आणि जेडीएसच्या आणखी 14 आमदारांच्या राजीनाम्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. या सर्व परिस्थितीत बहुमताचा आकडा 112 आहे. पण बंडखोर आमदार विधानसभेच्या कामकाजात सहभागी होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. यामुळे बहुमताचा आकडा 105 पर्यंत येणार आहे.
भाजपकडे स्वतःचे 105 आणि एक अपक्ष असे 106 आमदार असल्यामुळे बहुमत सिद्ध होणार आहे. येदियुरप्पा यांनी बहुमत सिद्ध केलं तरीही सरकार स्थिर ठेवण्याचं त्यांच्यासमोर आव्हान असेल. इतर 14 आमदारांना अपात्र ठरवलं जातं, की त्यांचा राजीनामा स्वीकारला जातो ते महत्त्वाचं आहे. बंडखोर आमदारांचा राजीनामा स्वीकारल्यास त्यांना पुन्हा पोटनिवडणूक लढता येईल. पण अपात्र ठरवल्यास टर्म संपेपर्यंत निवडणूक लढता येणार नाही. पोटनिवडणूक झाल्यास भाजपला 17 पैकी किमान 8 जागा जिंकाव्या लागतील.
येदियुरप्पा यांच्यासमोर आव्हानं मोठी असतील. बंडखोर आमदारांच्या जागी पोटनिवडणुका, स्थिर सरकार आणि मंत्रिमंडळ निश्चित करणं ही आव्हानं आहेत. मंत्रिमंडळ स्थापन करुन येदियुरप्पा समतोल साधण्याचा प्रयत्न करतील, असं बोललं जातंय.