50 हजार घरात 3 हजार किलोंच्या बुंदीच्या लाडूचे वाटप; जळगावच्या रामभक्तांचा आनंद गगनात मावेना
देशातील अनेक राज्यांमध्ये या सोहळ्यानिमित्ताने सुटी जाहीर केली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुटी जाहीर केली आहे. या सोहळ्यानिमित्ताने प्रत्येक भारतीयाने दारी दिवा प्रज्वलित करुन दिवाळी साजरी करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यातच आता राज्यातील अनेक शहरात यानिमित्ताने वेगवेगळ्या माध्यमांतून आनंद साजरा करण्यात येत आहे.
किशोर पाटील, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, जळगाव | 19 जानेवारी 2024 : अयोध्येत येत्या 22 जानेवारीला राम मंदिराची प्रतिष्ठापना होत आहे. या सोहळ्याची तयारी सर्वत्र सुरु आहे. अयोध्येत अनेक पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित हा धार्मिक सोहळा रंगणार आहे. देशभरातील रामभक्तांमध्ये या निमित्ताने उत्साह शिगेला पोहचला आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी जळगावातही जोरदार तयारी सुरु आहे. जळगावात रामभक्तांकडून तब्बल पन्नास हजार घरांमध्ये बुंदीच्या प्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
अयोध्येत प्रभू श्रीरामाची मूर्तीची प्रतिष्ठापना येत्या 22 जानेवारीला होत आहे. त्यामुळे रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून जळगाव शहरातील रिंग रोड परिसरातील हनुमान मंदिरांमध्ये तब्बल हजार किलोची बुंदी तयार करण्याचे काम सुरु आहे. 3 हजार किलोची बुंदी छोट्या- छोट्या पाकिटामध्ये भरण्यात येत आहे. ही प्रसादाची पाकीटे 22 जानेवारी रोजी जळगावातील विविध भागातील पन्नास हजार घरांमध्ये रामभक्तांद्वारे वाटली जाणार आहेत. अयोध्येच्या राम मंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद अशा अनोख्या पद्धतीने जळगावातील रामभक्त डॉ.अश्विन सोनवणे यांच्यावतीने साजरा केला जाणार आहे.
सुरक्षा यंत्रणा अलर्ट
योध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. देशातील महत्वपूर्ण स्थानक असलेल्या मनमाड रेल्वे स्थानकावर मॉकड्रील करण्यात आली आहे. यावेळी पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, श्वान पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून रेल्वे स्थानक परिसराची कसून तपासणी करण्यात आली. रेल्वे स्थानकाच्या सर्वसाधारण प्रतिक्षालयात ब्लॅक कमांडोमार्फत मॉकड्रील करण्यात आली.
मनसेची भंडाऱ्याला मदत
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून रामभक्त अयोध्येत दाखल झाले आहेत. या रामभक्तांची जेवणाची कुठलीही गैरसोय होऊ नये याकरिता हनुमान गढीच्या कल्याणदास महाराज यांच्याकडून भंडारा आयोजित करण्यात आला आहे. हा भंडारा 13 जानेवारीपासून ते 25 जानेवारीपर्यंत सुरु असणार आहे. या भंडाऱ्याला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईहून मदत पाठवली आहे. या भंडाऱ्याचा लाभ दिवसभरात 40 हजार रामभक्त घेत आहेत.