India vs Canada : दहशतवाद्यांसाठी आश्रय स्थान बनलाय कॅनडा, भारताची कॅनडाला चपराक
Canada India Tension : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी फुटीरतावादी नेता हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारतीय एजंटांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G-20 दरम्यानच्या भेटीवर त्यांना उत्तर दिले होते. सद्या दोन्ही देशांमध्ये तणावाची वातावरण आहे.
India vs canada : कॅनडा हे दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे अशा शब्दात भारताने गुरुवारी कॅनडाला जोरदार चपराक लावली आहे. ‘मला वाटते दहशतवादी, अतिरेकी आणि संघटित गुन्हेगारीसाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून कॅनडाची प्रतिष्ठा वाढत आहे. कॅनडाला आता आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेबद्दल काळजी करण्याची गरज आहे.’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे. धमक्यांमुळे कॅनडातील भारतीय उच्चायुक्तालय व्यवस्थित काम करत नाही आणि त्यामुळेच भारताने कॅनडाच्या नागरिकांची व्हिसा अर्ज प्रक्रिया थांबवली आहे.
भारताची कॅनडाला चपराक
“कॅनडामधील भारतीय उच्च आयोग आणि वाणिज्य दूतावास यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे कामकाजावर याचा परिणाम झालाय. त्यामुळेच आम्ही व्हिसा अर्जांची प्रक्रिया करण्यास तात्पुरते अक्षम असल्याचं अरिंदम बागची यांनी म्हटले आहे. कॅनडा सरकारचे आरोप हे बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. कॅनडाच्या भूमीवर काय घडते आहे याबाबत आम्ही विशिष्ट पुरावे दिले आहेत, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही.”
पीएम मोदी यांनी ट्रुडोचे आरोप फेटाळले
कॅनडासोबतच्या राजनैतिक वादावर भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली असून प्रमुख मित्र राष्ट्रांना देखील याबाबत माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, G20 शिखर परिषदेदरम्यान झालेल्या संभाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचा आरोप फेटाळून लावला होता.
‘भारतात कॅनडाच्या मुत्सद्यांची संख्या घटणार’
परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतातील कॅनडाच्या मुत्सद्दींची संख्या कमी केली जाईल. आम्ही कॅनडाच्या सरकारला कळवले आहे की आमच्या परस्पर राजनैतिक उपस्थितीत समानता असली पाहिजे. भारतातील त्यांच्या मुत्सद्दींच्या तुलनेत कॅनडातील आमची संख्या खूपच कमी आहे.’
भारत आणि कॅनडा यांच्यात तणाव वाढला
खलिस्तानच्या मुद्द्यावरून भारत आणि कॅनडा यांच्यात तणाव वाढला आहे. कॅनडामध्ये भारतीय उच्चायुक्तांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. भारताने अॅडवायजरी जारी करत कॅनडामधील हिंदू नागरिकांना अधिक सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. सोशल मीडियावर खलिस्थान समर्थकांकडून हिंदूना धमक्या येत आहेत.
2017 मध्ये पंजाबमधून कॅनडामध्ये पळून गेलेला गँगस्टर सुखदुल सिंग याची कॅनडातील विनिपेगमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. सुखदुल सिंग यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे.