Canada India Row : भारताने अल्टिमेटम देताच थरकाप, कॅनडाने घेतला मोठा निर्णय; अखेर…
खलिस्तानी फुटीरतावादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडाच्या संबंधात कटुता आली होती. ही कटुता इतकी वाढली की भारताने थेट कॅनडालाच सुनावलं होतं. त्यामुळे कॅनडाचा चांगलाच थरकाप उडाला आहे.
नवी दिल्ली | 20 ऑक्टोबर 2023 : खलिस्तानी फुटीरतावादी हरदीप सिंग निज्जर याची हत्या करण्यात आल्यानंतर भारत आणि कॅनडा दरम्यान तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांमध्ये मोठी कटुताही निर्माण झाली आहे. या तणावाच्या दरम्यान भारताने कॅनडाला त्यांचे राजदूत माघारी घेण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी कॅनडाला अल्टिमेटमही दिला होता. भारताचा अल्टिमेटम मिळताच कॅनडाने सपशेल शरणागती पत्करली आहे. कॅनडाने त्यांचे 41 राजदूत माघारी बोलावले आहेत. तशी घोषणाच कॅनडाचे परराष्ट्र मंत्री म्लानी जोली यांनी केली आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या आरोपानंतर भारत आणि कॅनडा दरम्यानचा तणाव अधिकच वाढला आहे. त्यानंतर भारताने कॅनडाच्या 41 राजदूतांना देश सोडून जाण्याचे आदेश दिले होते. तसेच त्यांना 10 ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईनही दिली होती. पण, कॅनडाने डेडलाईनच्या आत आपले राजदूत माघारी बोलावले नाहीत. त्यानंतर आता कॅनडाने सपशेल शरणागती पत्करत आपले 41 राजदूत मायदेशी बोलावले आहेत.
देशांतर्गत हस्तक्षेप वाढला
कॅनडाचे भारतात एकूण 62 राजदूत आहेत. त्यातील 41 राजदूत हटवण्यात आले आहेत. मात्र, उरलेले 21 राजदूत भारतातच राहणार आहेत. भारतानेही 41 राजदूतांनाच माघारी बोलावण्याचं अल्टिमेट कॅनडाला दिलं होतं. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाला सुनावलं होतं. भारतात मोठ्या प्रमाणावर कॅनडाचे राजदूत आहेत. हे राजदूत देशातील अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करत आहेत. त्यामुळे त्यांनी तात्काळ देश सोडला पाहिजे, असं भारताने म्हटलं होतं.
ट्रुडो यांच्या विधानाने तणाव
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या एका विधानाने भारत आणि कॅनडा दरम्यानचा तणाव वाढला होता. 18 सप्टेंबर रोजी ट्रुडो यांनी हे विधान केलं होतं. खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा दावा ट्रुडो यांनी केला होता. ट्रुडो यांच्या या आरोपाने खळबळ उडाली होती. भारताने हे आरोप फेटाळून लावले होते.
ट्रुडो यांचं विधान निराधार आहे. राजकीय हेतूने त्यांनी हे विधान केल्याचं भारताने म्हटलं होतं. त्यानंतर कॅनडाने भारताच्या राजदूताला बेदखल केलं होतं. त्याला जशास तसे उत्तर देत भारतानेही कॅनडाच्या राजदूतांना देश सोडून जाण्याचे फर्मान बजावलं होतं.
ट्रुडो नरमले
ट्रुडो यांच्या विधानाने दोन्ही देशातील संबंधात कटुता आली होती. भारतानेही त्यानंतर खाक्या दाखवताच कॅनडाचे पंतप्रधान हळूहळू नरमले होते. त्यानंतर त्यांनी भारताशी सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. भारतानेही निज्जर हत्याकांडाचे ठोस सबूत द्या, त्यानंतर त्यावर विचार करू, असं म्हटलं होतं.
काय आहे प्रकरण?
खलिस्तानी फुटीरतावादी हरदीप सिंग निज्जर याची 18 ऑक्टोबर रोजी कॅनडात हत्या करण्यात आली होती. गुरुद्वाराबाहेरच त्याला गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर 18 सप्टेंबर रोजी कॅनडाने या प्रकरणात भारताला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर भारताच्या राजदूतांना कॅनडातून जायला सांगितलं होतं. त्यामुळे भारतानेही जशासतसे उत्तर देत कॅनडाच्या राजदूतांना देश सोडून जाण्याचे फर्मान बजावले होते.