मुख्यमंत्र्याच्या चुलत्यालाच उचलले, सीबीआयची मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या चुलत्याला अटक करण्यात आली आहे. विवेकानंद रेड्डी मर्डर केसमध्ये सीबीआयने त्यांना आज अटक केली. त्यामुळे आंध्रात खळबळ उडाली आहे.
हैदराबाद : आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगमोहन रेड्डी यांच्या चुलत्याला अटक करण्यात आली आहे. विवेकानंद रेड्डी मर्डर केसमध्ये सीबीआयने मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे काका वायएस भास्कर रेड्डी यांना अटक केली आहे. यापूर्वी शुक्रवारी सीबीआयने उदयकुमार रेड्डी यांना अटक केली होती. सीबीआयने उदयकुमार रेड्डी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आले. त्यानंतर आज वायएस भास्कर रेड्डी यांना अटक करण्यात आली आहे.
विवेकानंद रेड्डी हे सुद्धा दिवंगत मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचे भाऊ आहेत. तसेच विद्यमान मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे चुलते आहेत. 15 मार्च 2019 रोजी रात्री विवेकानंद रेड्डी यांची त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्यात आली होती. पुलिवेंदुला येथे विवेकानंद रेड्डी हे राहत होते. या हत्येनंतर हे प्रकरण एसआयटीकडे सोपवण्यात आले होते. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. आंध्रप्रदेशात निवडणुका होण्याच्या आठ दिवस आधीच म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावर विवेकानंद रेड्डी यांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
चार्जशीट काय सांगते?
सीबीआयच्या चार्जशीटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. विवेकानंद रेड्डी हे कडप्पा लोकसभा मतदारसंघातून कथितरित्या स्वत:साठी किंवा वायएस शर्मिला (मुख्यमंत्री जनग मोहन रेड्डी यांची बहीण) किंवा वायएस विजयम्मा ( जगनमोहन रेड्डी यांची आई) यांच्यासाठी तिकीट मागत होते, असं सीबीआयच्या चार्जशीटात नमूद करण्यात आलं आहे.
आधी चौकशीनंतर अटक
उदयकुमार रेड्डी आणि त्यांचे वडील जयप्रकाश रेड्डी यांची पोलिसांनी चौकशी केली आहे. विवेकानंद रेड्डी यांच्या शरीरावर जे घाव झाले होते, ते बँडेजने लपवण्याचा आरोप त्यांच्यावर होता. उदयकुमार तुम्मलापल्ली युरेनियम फॅक्ट्रीत काम करत होते. त्यांचीही सीबीआयने चौकशी केली. विवेकानंद रेड्डी यांची हत्या झाल्यानंतर घटनास्थळी जे लोक सर्वात आधी पोहोचले होते. त्यापैकी उदयकुमार रेड्डी हे एक होते. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली.