CBI RAID : लालू यादव कुटुंब अडचणीत, पाहा काय आहेत ती ७ प्रकरणे?
माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण रेल्वे नोकरी घोटाळ्यात सीबीआयने त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला असून चौकशी सुरु आहे.
पटना : सोमवारी सीबीआयचे ( CBI Raid ) पथक छापा टाकण्यासाठी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी ( Rabri Devi ) यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. तपास यंत्रणांना असे आढळून आले की अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात लालू यादव कुटुंबातील सदस्याला रेल्वेत नोकरी मिळण्याच्या अवघ्या ३ दिवस आधी जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे. जमीन घोटाळ्याची 7 प्रकरणे असून त्यात लालू कुटुंबाचा थेट सहभाग असल्याचे दिसते. या प्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने लालू यादव, राबडी देवी आणि मिसा भारती यांना समन्स बजावले असून त्यांना १५ मार्चला कोर्टात हजर केले आहे.
नोकरी घोटाळा काय?
लालू यादव यांनी रेल्वेमंत्री असताना कोणतीही जाहिरात न देता अनेकांना नोकऱ्या दिल्याचा आरोप आहे. नोकरीच्या बदल्यात त्यांच्याकडून जमीन घेऊन ती कुटुंबीयांच्या नावावर करण्यात आली. जमिनीचे एकूण क्षेत्रफळ १,०५,२९२ चौरस फूट असल्याचे सांगण्यात आले. या अर्जदारांची रेल्वेच्या वेगवेगळ्या झोनमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. नवीन नोकरीच्या बदल्यात जमीन घेण्याचे हे प्रकरण लालू यादव 2004 ते 2009 दरम्यान रेल्वेमंत्री असतानाचे आहे.
सीबीआयने प्रथम 23 सप्टेंबर 2021 रोजी प्राथमिक चौकशी नोंदवली. सीबीआयचे म्हणणे आहे की, रेल्वेमध्ये भरतीसाठी कोणतीही जाहिरात किंवा सार्वजनिक सूचना जारी करण्यात आलेली नाही. पाटणा येथील रहिवाशांना मुंबई, जबलपूर, कोलकाता, जयपूर आणि हाजीपूर येथील विविध विभागीय रेल्वेमध्ये नियुक्त करण्यात आले होते.
यापूर्वी अर्जदारांना तात्पुरत्या नोकऱ्या दिल्या जात होत्या. जमिनीची वाटाघाटी झाल्यावर त्यांच्या नोकऱ्या कायम करण्यात आल्या. अशाप्रकारे नोकऱ्या देण्यासाठी नेटवर्क तयार करण्यात आले. तपासादरम्यान ईडी आणि सीबीआयला धक्कादायक असे अनेक पुरावे मिळाले.
कोणती आहेत ती सात प्रकरणे?
प्रकरण 1 : तपासादरम्यान सीबीआयला असे आढळून आले आहे की पाटणा येथील किशून देव राय यांनी आपली जमीन 6 फेब्रुवारी 2008 रोजी राबडी देवीच्या नावावर अत्यंत कमी किमतीत हस्तांतरित केली होती. राबडी देवी यांना 3,375 चौरस फूट जमीन अवघ्या 3.75 लाख रुपयांना विकली. एवढेच नाही तर कुटुंबातील 3 सदस्य राज कुमार सिंह, मिथिलेश कुमार आणि अजय कुमार यांना मध्य रेल्वे मुंबईत ग्रुप डी पदांवर नोकरी मिळाली.
प्रकरण 2 : महुआबाग, पाटणा येथील संजय राय यांनीही फेब्रुवारी 2008 मध्ये राबडी देवी यांना 3,375 चौरस फूट जमीन केवळ 3.75 लाख रुपयांना विकली. सीबीआयच्या तपासात संजय राय व्यतिरिक्त कुटुंबातील इतर 2 सदस्यांना रेल्वेत कायमस्वरूपी नोकरी मिळाल्याचे समोर आले आहे.
प्रकरण 3 : नोव्हेंबर 2007 मध्ये पाटणा येथील किरण देवी यांनी 80,905 चौरस फूट जमीन लालू यादव यांची मुलगी मीसा भारती यांना केवळ 3.70 लाख रुपयांना विकली. जमीन मिसाच्या नावावर झाल्याने किरण देवी यांचा मुलगा अभिषेक कुमार याला सेंट्रल रेल्वे मुंबईत नोकरी लागली.
प्रकरण 4 : फेब्रुवारी 2007 मध्ये पाटणा रहिवासी हजारी राय यांनी त्यांची 9,527 चौरस फूट जमीन दिल्लीस्थित कंपनी एके इन्फोसिस्टम प्रायव्हेट लिमिटेडला 10.83 लाख रुपयांना विकली. या करारानंतर हजारी राय यांचे दोन पुतणे दिलचंद कुमार आणि प्रेमचंद कुमार यांना पश्चिम-मध्य रेल्वे जबलपूर आणि दक्षिण-पूर्व रेल्वे कोलकाता येथे नोकरी मिळाली. AK Infosystem चे सर्व हक्क आणि मालमत्ता लालूंची मुलगी मीसा आणि पत्नी राबरी यांना 2014 साली देण्यात आली होती. 2014 मध्ये राबडी देवी यांनी कंपनीचे बहुतांश शेअर्स विकत घेतले आणि नंतर त्या कंपनीच्या संचालक झाल्या.
प्रकरण 5 : मे 2015 मध्ये पाटणा येथील लाल बाबू राय यांनी त्यांची 1,360 चौरस फूट जमीन राबडी देवी यांना केवळ 13 लाख रुपयांमध्ये हस्तांतरित केली आणि बाबू राय यांच्या मुलाला उत्तर-पश्चिम रेल्वे, जयपूरमध्ये नोकरी मिळाली.
प्रकरण 6: मार्च 2008 मध्ये, ब्रिज नंदन राय यांनी त्यांची 3,375 चौरस फूट जमीन गोपालगंज येथील रहिवासी हृदयानंद चौधरी यांना 4.21 लाख रुपयांना विकली. 2005 मध्ये हृदयानंद चौधरी यांना पूर्व-मध्य रेल्वे हाजीपूरमध्ये नोकरी मिळाली. 2014 मध्ये हृदयानंद चौधरी यांनी ही जमीन लालू प्रसाद यादव यांची मुलगी हेमा यांना गिफ्ट डीडद्वारे हस्तांतरित केली.
प्रकरण 7: मार्च 2008 मध्ये, विशून देव राय यांनी त्यांची सिवानमधील 3,375 चौरस फूट जमीन लालन चौधरी यांना हस्तांतरित केली. लालन यांचा नातू पिंटू कुमार याला 2008 मध्ये पश्चिम रेल्वे मुंबईत नोकरी मिळाली आणि त्यानंतर लालन चौधरी यांनी फेब्रुवारी 2014 मध्ये ही जमीन हेमा यादव यांना दिली.