देश हादरवणाऱ्या मणिपूरच्या ‘त्या’ घटनेची सीबीआय चौकशी होणार; राज्याबाहेर होणार आरोपींची ट्रायल

| Updated on: Jul 28, 2023 | 10:36 AM

4 मे रोजी मणिपूरमध्ये एका जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली. या महिलांच्या अंगावर कपड्याचा एक तुकडाही नव्हता. या महिलांना शेतात नेले. त्यांच्यामागे जमाव ओरडत होता.

देश हादरवणाऱ्या मणिपूरच्या त्या घटनेची सीबीआय चौकशी होणार; राज्याबाहेर होणार आरोपींची ट्रायल
cbi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली | 28 जुलै 2023 : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेने संपूर्ण देशच नव्हे तर जग हादरून गेलं आहे. या घटनेमुळे देशात संतापाची लाट आली आहे. संसदेपासून रस्त्यापर्यंत या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे अखेर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करणार आहे. मात्र, आरोपींची ट्रायल मणिपूरऐवजी इतर राज्यात करणार आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षाचे खासदार उद्या मणिपूरमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

मणिपूर घटनेचे संसदेत पडसाद उमटले आहेत. त्यामुळे संसदेचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागत आहे. त्यामुळे सरकारने मणिपूरचं प्रकरण सीबीआयकडे सोपवलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसा सुरू आहे. त्यामुळे राज्यातील हिंसेच्या घटनेची प्रकरणे पूर्वोत्तर राज्यांबाहेर चालवण्याचं सरकार दरबारी घटत आहे. या प्रकरणी सरकार एक प्रतिज्ञापत्रही सादर करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

विरोधक उद्या मणिपूरमध्ये

दरम्यान, विरोधी पक्षाचे खासदार उद्या मणिपूरला जाणार आहेत. उद्या आणि परवा दोन दिवस हे खासदार मणिपूरमधील हिंसेचा आढावा घेणार आहेत. यावेळी खासदार पीडितांची विचारपूस करणार असल्याचंही सांगितलं जात आहे. राज्यात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून विरोधकांनी मणिपूरला जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

अन् देश हादरला…

4 मे रोजी मणिपूरमध्ये एका जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली. या महिलांच्या अंगावर कपड्याचा एक तुकडाही नव्हता. या महिलांना शेतात नेले. त्यांच्यामागे जमाव ओरडत होता. या महिला मदतीसाठी याचना करत होत्या. त्यानंतर या महिलांना शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेची कुठेही वाच्यता झाली नाही. नराधम राजरोसपणे फिरत होते. मात्र, अचानक दोन महिन्यानंतर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला अन् संपूर्ण देशाच्या काळजात धस्स झालं. देश हादरून गेला.

देशभर संतापाची लाट आली. स्वत: सर्वोच्च न्यायालयाने स्यूमोटो घेत केंद्र आणि राज्य सरकारला फटकारले. या प्रकरणी गंभीरपणे आणि तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले. कोर्टाने कान उपटल्यानंतर मणिपूरचे पोलीसही जागे झाले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत चारजणांना अटक केली. मुख्य आरोपीच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.