VIDEO: बिपीन रावत यांच्या अपघाताचा तो व्हिडिओ खरा; शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?
सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या सत्यतेबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.
चेन्नई: सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या सत्यतेबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, हा व्हिडीओ खरा असल्याचं आढळून आलं आहे. टीव्ही9च्या रिपोर्टरने घटनास्थळी जाऊन या संपूर्ण परिसराची पाहणी केली असता हा व्हिडीओ खरा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
अवघा 20 सेकंदाचा व्हिडीओ
हा अवघा 20 सेकंदाचा व्हिडीओ आहे. दुपारच्यावेळी हा व्हिडीओ शूट केल्याचं दिसत आहे. या व्हिडिओत चार महिला आणि एक पुरुष दिसत आहे. घनदाट जंगलात हे लोक दिसत आहेत. या ठिकाणी रेल्वे रुळ दिसत असून रुळाच्या दोन्ही बाजूने गर्द झाडी दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमच्या रिपोर्टरने या व्हिडीओची सत्यता तपासण्यासाठी थेट कुन्नूरच्या जंगलात गेला. त्यावेळी व्हिडीओतील तिच जागा तिथे आढळून आली. त्यामुळे हा व्हिडीओ खरा असल्याचं दिसून आलं आहे.
भयंकर असा घरघर आवाज आला अन्
हे सर्व लोक पर्यटक असल्याचं सांगितलं जातं. व्हिडीओत प्रत्यक्ष एक पुरुष आणि चार महिला दिसत असल्या तरी प्रत्यक्षात घटनास्थळी दोन पुरुष असल्याचं संभाषणावरून दिसून येत आहे. हे लोक रुळावरून चालत असताना त्यांना हेलिकॉप्टरची भयंकर घरघर ऐकायला आली. हेलिकॉप्टर घरघर करतानाच हा आवाज नेहमीप्रमाणे न वाटल्याने हे लोक पळतच पुढच्या दिशेने गेले. त्यावेळी त्यांना एक हेलिकॉप्टर जाताना दिसलं. त्यानंतर अवघ्या काही क्षणातच हे हेलिकॉप्टर ढगात गडप झालं. पण हेलिकॉप्टरची घरघर कायम होती. ही घरघर ऐकून हे पर्यटकही घाबरल्याचं दिसून येतं. एकाने तर हेलिकॉप्टरची घरघर ऐकून कानात बोटं घातली. हेलिकॉप्टर ढगात गेल्यानंतर एका व्यक्तीने व्हिडीओ शुटिंग करणाऱ्या व्यक्तीला तमिळमध्ये काही तरी विचारलं. काय झालं? हेलिकॉप्टरचा असा आवाज का येतोय? असं कदाचित या व्यक्तिने विचारलं असावं. त्यावर दुसऱ्या व्यक्तीने आमा… असं म्हटलंयाचं ऐकू येतं.
दाट धुक्यात हेलिकॉप्टर गडप
कुन्नूरचं हे जंगल अत्यंत गर्द झाडीने वेढलेलं आहे. बाजूलाच निलगीराचा पर्वत आहे. साधारण दुपारची वेळ असूनही या परिसरात प्रचंड धुके दाटल्याचं व्हिडीओतून दिसून येतं. ढगाळ वातावरण आणि धुकं. तसेच परिसरात पाऊस पडून गेल्याच्या खुणाही व्हिडीओत पाहायला मिळतात. हेलिकॉप्टरचा आवाज आला आणि काही क्षणातच घरघर करत हे हेलिकॉप्टर धुक्यात हरवलं. बराच प्रयत्न करूनही हे हेलिकॉप्टर दिसलं नाही. फक्त आवाज येत होता. यावरून या परिसरात किती प्रचंड प्रमाणात धुकं दाटलेलं होतं याचा अंदाज येतो.
इंजिनाचा आवाज बंद झाला अन्
प्रचंड आवाज करत हे हेलिकॉप्टर धुक्यात शिरलं. त्यानंतर काही वेळात इंजिनाचा आवाज बंद झाला असल्याचं दिसून येतं. इंजिन बंद झाल्यानंतरच हे हेलिकॉप्टर कोसळल्याचं सांगितलं जातं.
#WATCH | Final moments of Mi-17 chopper carrying CDS Bipin Rawat and 13 others before it crashed near Coonoor, Tamil Nadu yesterday
(Video Source: Locals present near accident spot) pic.twitter.com/jzdf0lGU5L
— ANI (@ANI) December 9, 2021
संबंधित बातम्या:
जितेंद्र आव्हाडांकडून संजय राऊतांना नमन, ‘पवारांना खुर्ची देताना माणुसकीचं दर्शन’, भाजपवर शरसंधान