नवी दिल्ली : तामिळनाडूत झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात देशाने आपला पहिला सीडीएस गमावला आहे. या अपघातात सीडीएस बिपीन रावत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यासोबत आणखी 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात त्यांच्या पत्नी मधुलिका यांचाही समावेश आहे. त्यामुळे संपूर्ण देशात सध्या शोकाकूल वातावरण आहे. देशाने बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अन्य 11 अधिकाऱ्यांना कायमचे गमावले आहे. पंतप्रधान राष्ट्रपतींसह, सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
उद्या पार्थीव दिल्लीत आणणार
काही तासांपूर्वीच सीडीएस बिपीन रावत यांची निधनवार्ता सैन्याने कळवली आहे. अपघातनंतर तामिळनाडूतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. त्यानंतर उद्या त्यांचं पार्थिव तामिळनाडूतून दिल्लीत आणलं जाणर आहे. राजधानी दिल्लीतही आता शोकाकूल वातावरण आहे.
देशाने धाडसी अधिकारी गमावला
या हेलिकॉप्टर अपघातामुळे देशाने एक धाडसी अधिकारी गमावला आहे. सीडीएस बिपीन रावत यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य सैन्यासाठी आणि देशसेवेसाठी अर्पण केले. त्यांच्या नावावर अनेक धाडसी पराक्रम आहेत. सर्जिकल स्ट्राईकच्या प्लॅनिंगमध्येही त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. सीडीएस बिपीन रावत कारगील युद्धातही सहभागी झाले होते. त्यांचं देशासाठीचे अनमोल योगदान देश आणि भारतीय सैन्य कधीही विसरू शकणार नाही.
राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
अशा धाडसी अधिकाऱ्याला गमावल्यानंतर देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. तर पंतप्रधान मोदी यांनीही ट्विट करत दु:ख व्यक्त केले आहे. याशिवाय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही दु:ख व्यक्त केले आहे.