OBC Reservation: केंद्राने राज्याला ओबीसीचा इम्पिरिकल डेटा द्यावा; सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी
ओबीसी आरक्षण अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. लोकसभेतही त्याचे आज पडसाद उमटले.
नवी दिल्ली: ओबीसी आरक्षण अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. लोकसभेतही त्याचे आज पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लावून धरला. ओबीसींचा इम्पिरिकल डेटा राज्याला देण्यात यावा, अशी मागणीच सुप्रिया सुळे यांनी केली.
केंद्राने राज्याला ओबीसीचा इम्पिरिकल डेटा दिला पाहिजे. तुमच्याकडे डेटा आहे. त्यामुळे तुम्ही भूमिका स्पष्ट केली पाहिजे. कोर्टाच्या निर्णायमुळे पंचायत राजमध्ये ओबीसींवर अन्याय होत आहे. तो होणार नाही याकडे केंद्राने लक्ष घातलं पाहिजे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
उद्या इतर राज्यांवरही परिणाम होईल
ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने एका मताने घेतला आहे. आता महाराष्ट्रासाठी हा निर्णय झाला. उद्या इतर राज्यातही होईल. महाराष्ट्रात हे बिल पास झालंय इथेही झालं आहे. केंद्राला नम्र विनंती आहे की, आपण महाराष्ट्र सरकार आणि सर्वच राज्यांच्या बाजूने निर्णय घ्यावा. ओबीसींवर अन्याय होता कामा नये, असं आवाहनही त्यांनी केलं.
मराठा, धनगर आरक्षणाचाही विचार करा
दरम्यान, त्या आधी सुप्रिया सुळेंनी ओबीसी आरक्षणा संदर्भात एक ट्विट केलं होतं. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे.ओबीसी आरक्षणाचा विषय संसदेत मांडून त्यावर सकारात्मक निर्णय घेणे सरकारला शक्य आहे. यासोबतच मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दाही घेण्यात यावा. हा कोट्यवधी जनतेच्या हिताचा मुद्दा आहे. हे लक्षात घेता या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने सदर समाजांच्या आरक्षणाचे प्रस्ताव सभागृहात मांडून त्यांना न्याय देण्याची ठाम भूमिका घ्यावी, ही आमची मागणी आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.
कोर्ट काय म्हणाले?
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. राज्य सरकारचा अध्यादेश गृहित धरता येणार नाही, असं सांगत महाराष्ट्र सरकारच्या अध्यादेशाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. वॉर्डनिहाय ओबीसींचा डेटा मिळत नाही तोपर्यंत तोपर्यंत निवडणुका घेता येणार नाहीत, असं निरिक्षणही सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. न्यायमूर्ती एएम खानविलकर आणि न्यायमूर्ती सीटी रवीकुमार यांच्या खंडपीठानं महाराष्ट्र सरकारच्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या रिट याचिकेवर आदेश देताना ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली. अशावेळी फेब्रुवारीमध्ये 23 महापालिका, 25 जिल्हा परिषदा, 299 पंचायत समित्या, त्याचबरोबर 285 नगर परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
संबंधित बातम्या:
Nashik| लिंगभावात्मक संवेदनशीलता व्यक्तिमत्वात रुजावी; कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांचे आवाहन
जिल्हा बँकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले; 21जागांसाठी तब्बल 299अर्ज ; असा आहे निवडणूक कार्यक्रम
औरंगाबादः वैजापुरातील पालखेड यात्रेतील शंकरपट उधळला, 26 जणांवर गुन्हे, 31 लाखांचा माल जप्त !