Chandrayaan-3 Update | 70 वर्षात चंद्रावर एकूण 111 मिशन्स, यात किती यशस्वी? किती फेल?
Chandrayaan-3 Update | क्रू मिशनमध्ये फक्त एक देश यशस्वी. कुठल्याही चांद्र मिशनमध्ये शेवटची 10 ते 15 मिनिट खूप महत्त्वाची असतात. याचवेळी गडबड होण्याचा धोका असतो.
नवी दिल्ली : रशियाच Luna-25 मिशन फेल झालं. त्यामुळे अनेकांच्या मनात धाकधूक वाढली आहे. रशियाकडे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग यशस्वी करण्याचा चांगला अनुभव आहे. मात्र, तरीही रशियाला Luna-25 मिशनमध्ये अपयश आलं. आता पुढच्या दोन दिवसात भारताचं चांद्रयान-3 च चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. इस्रोने मिशन यशस्वी करण्यासाठी सर्व बाजूंनी काळजी घेतली आहे. मात्र, तरीही मनात धाकधूक कायम आहे. कारण कुठल्याही चांद्र मिशनमध्ये शेवटची 10 ते 15 मिनिट खूप महत्त्वाची असतात. याचवेळी गडबड होण्याचा धोका असतो. रशियाने 50 वर्षानंतर चांद्र मोहीमेची आखणी केली होती. पण त्यात त्यांना अपयश आलं.
भारताच्या चांद्रयान-3 ने चंद्रावर सॉफ्ट लँडिंगसाठी जो मार्ग पकडलाय, त्यात फेल होण्याची शक्यता कमी आहे. लूना-25 क्रॅश झाल्यानंतर रॉसकॉसमॉसने सांगितलं की, स्पेसक्राफ्टची दिशा भरकटली व त्याने चुकीच्या ऑर्बिटमध्ये प्रवेश केला.
मागच्या 70 वर्षात किती मोहिमा?
मागच्या 70 वर्षात एकूण 111 चांद्र मोहीमा करण्यात आल्या. त्यात 66 मिशन्समध्ये यश मिळालं. 41 मोहीमा फेल गेल्या. 8 मिशन्समध्ये आंशिक यश मिळालं. मून मिशनमध्ये यशाची शक्यता 50 टक्के असते, असं इस्रोचे माजी प्रमुख जी माधवन नायर यांनी सांगितलं आहे. 1998 ते 2023 दरम्यान भारत, अमेरिका, रशिया, जापान, यूरोपीय संघ, चीन आणि इस्रायलने अनेक चांद्र मोहीमा केल्या. यात इम्पॅक्टर, ऑर्बिटर, लँडर-रोव्हर आणि फ्लायबाय मिशन्स होते. 2000 ते 2009 दरम्यान किती मिशन्स झाले?
2000 ते 2009 दरम्यान 9 वर्षात सहा चांद्र मोहिमा करण्यात आल्या. यात यूरोपच स्मार्ट-1, जापानच सेलेन, चीनच चांगई-1, भारताच चांद्रयान-1 आणि अमेरिकेच्या लूनर रीकॉनसेंस ऑर्बिटर मिशनचा समावेश आहे. 1990 पासून आतापर्यंत अमेरिका, जापान, भारत, यूरोपीय संघ, चीन आणि इस्रायलने एकूण मिळून 21 मून मिशन केले. रशियाची 21 किंवा 22 ऑगस्टला लूना-25 ला चंद्राच्या पुष्ठभागावर उतरवण्याची योजना होती. चंद्राच्या पुष्ठभागापासून 18 किमी उंचीवरुन लँडिंग सुरु होणार होतं. पण त्याआधीच हे मिशन फेल झालं.