Chandrayaan 3 : पुन्हा जागे होणार विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान ? चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर होत आहे सकाळ
चंद्रयान-3 च्या लॅंडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांना जर पुन्हा कार्यरत करण्यात यश आले तर इस्रोला बोनस टाईम मिळणार आहे. त्यामुळे गुढ अशा दक्षिण ध्रुवावरील अनेक रहस्य शोधण्यास अतिरिक्त वेळ मिळणार आहे.
नवी दिल्ली | 20 सप्टेंबर 2023 : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पुन्हा एकदा सकाळ होणार आहे. त्यामुळे चंद्रयान-3 चे स्लीप मोडवर ठेवण्यात आलेले विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा जागृत होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. 22 सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुर्याची किरणे पोहचणार आहेत. त्यानंतर इस्रो पुन्हा एकदा चंद्राच्या विक्रम लॅंडर आणि रोव्हर प्रज्ञानला जागे करण्याचा प्रयत्न करणार आहे. चंद्रयान-3 मोहिमेचा कार्यकाळ आधी ठरल्याप्रमाणे चंद्राच्या 1 दिवसा इतका ( पृथ्वीचे 14 दिवस ) निश्चित केला होता. 14 दिवसाचे काम संपवून चंद्रयान-3 ची उपकरणे स्लीप मोडवर गेली आहेत. आता त्यांना पुन्हा कार्यरत करून त्यांचा वापर करता येतो का ? याची पाहणी केली जाणार आहे.
चंद्रयान-3 च्या लॅंडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान जर पुन्हा कार्यरत करण्यात यश आले तर इस्रोला बोनस टाईम मिळणार आहे. लॅंडर विक्रमने 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लॅंडींग केली होती. त्यानंतर रोव्हर प्रज्ञान बाहेर आला त्याने चंद्रावर फिरुन विविध चाचण्या केल्या. 12 दिवस विविध रोचक माहिती इस्रोला पुरविली. त्यानंतर तेथे रात्र सुरु झाल्याने सुर्यप्रकाशा अभावी लॅंडर विक्रम आणि प्रज्ञान रोव्हरची बॅटरी चार्ज होऊन ते पुन्हा कार्यरत करता येणार का ? हे इस्रो पाहणार आहे.
रहस्यं शोधायला इस्रोला मदत
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्रीच्या वेळी तापमान मायनस 240 डीग्रीपर्यंत निच्चांकी गाठते. अशा वेळी कोणालाही चंद्रावर तगणे कठीण आहे. तसेच चंद्रावर सतत भूकंप येत असतात. तसते चंद्रावर सतत उल्का आणि अशनी देखील कोसळत असतात. त्यामुळे केवळ सुदैवाने विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्या बॅटरी कार्यरत झाल्या तर मोठा चमत्कार ठरणार आहे. कारण 14 दिवस चंद्राच्या आतापर्यंत जगापासून अपरिचित आणि रहस्यमयी जागेतील आणखी रहस्यं शोधायला इस्रोला मदत मिळणार आहे. चंद्रयान 3 मध्ये लिथियम आयर्न बॅटरीचा वापर केला असून कमी तापमानातही ती खराब होत नाही आणि ऊर्जा साठवून ठेवते.
तर मोठा चमत्कार ठरेल…
आता चंद्रयान-3 च्या विक्रम लॅंडर आणि रोव्हर प्रज्ञान याचे जागृत होणे हे केवळ त्याने आपली किती बॅटरी वाचवून ठेवली आहे यावर अवलंबून आहे. त्यामुळे बॅटरी पुन्हा चार्ज करता येणे शक्य झाले तर इस्रोसाठी तो मोठा चमत्कार ठरणार आहे. याआधी रोव्हर प्रज्ञानने चंद्रावर पाणी असल्याचे सांगितले होते. तसेच ऑक्सिजन आणि सल्फर ही मुलद्रव्ये देखील शोधून काढली आहेत.