चेन्नई | 21 सप्टेंबर 2023 : तुमच्या खात्यात 9 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. असा मेसेज समजा तुम्हाला आला तर तुम्ही काय कराल? पैसे उडवाल की बँकेला कळवाल? सांगता येत नाही ना? कारण ही अनपेक्षित गोष्ट आपल्याबाबतीत घडेलच कशी? असा पहिला प्रश्न तुम्हाला पडला आहे. एका ड्रायव्हरलाही हाच प्रश्न पडला होता. फरक फक्त एवढाच होता की, त्याच्या खात्यात 9 हजार कोटी रुपये जमा झाले होते. त्यानंतर त्याला हा प्रश्न पडला होता. एवढी मोठी रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर त्याला जणू लॉटरीच लागल्याचा भास झाला. तो हवेत तरंगू लागला. एका सेकंदात रंकाचा रवा झाला. पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण तो पुन्हा रावाचा रंक झाला होता. नेमकं काय घडलं होतं असं?
तामिळनाडूचा कार ड्रायव्हर राजकुमार याला एक मेसेज आला आणि काही क्षण नावाप्रमाणेच आपण राजकुमार झाल्याचा भास झाला. कारण त्याच्या खात्यात अचानक 9 हजार कोटी रुपये आले होते. तुमच्या खात्यात 9 हजार कोटी रुपये जमा झाल्याचा मेसेजही त्याला आला. ही रक्कम येताच त्याने त्यातील 21 हजार रूपये आपल्या मित्राच्या खात्यात ट्रान्स्फर केले. पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. बँकेने हे सर्व पैसे काढून घेतले. कारण बँकेकडून चुकून त्याच्या खात्यात एवढी मोठी रक्कम वर्ग केल्या गेली होती.
राजकुमार हा पलानी येथील रहिवासी आहे. तो कार ड्रायव्हर आहे. कोडंबक्कम येथे ते आपल्या मित्रासोबत राहतो आणि कार चालवतो. सप्टेंबर रोजी त्याच्या खात्यात 9 हजार कोटी रुपये जमा झाल्याचा त्याला मेसेज आला. त्यामुळे त्यालाही आश्चर्य वाटलं. राजकुमारचं तामिळनाडूच्या मर्केंटाईल बँकेत अकाऊंट आहे. त्याच्या खात्यात अवघे 105 रुपये होते. त्याला वाटलं कोणी तरी आपल्याला फसवू इच्छितंय. त्यामुळे त्याने खात्यात रक्कम येताच त्यातील 21 हजार रुपये मित्राच्या खात्यावर वळती केले.
त्यानंतर थोड्यावेळाने बँक अधिकाऱ्यांनी राजकुमारशी संपर्क साधला आणि चुकून तुमच्या खात्यात ही रक्कम आल्याची माहिती दिली. तसेच ही रक्कम कुणालाही ट्रान्स्फर न करण्याच्या सूचनाही बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्याला दिल्या. त्यानंतर थोड्यावेळाने बँकेने ही रक्कम काढून घेतली. त्यानंतर बँकेने राजकुमारशी पुन्हा संपर्क साधला. मित्राला पाठवलेले 21 हजार रुपयेही परत करण्याच्या सूचना त्याला केल्या आहेत. त्यामुळे राजकुमारला आता ही रक्कम परत करावी लागणार आहे.