छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात सर्वात मोठी कारवाई, तब्बल 32 नक्षलवाद्यांचा खात्मा
छत्तीसगडमध्ये पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात सर्वात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी तब्बल 32 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात अजूनही चकमक सुरु आहे. त्यामुळे मारल्या जाणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या अजूनही वाढू शकते.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या नारायणपूर येथील जंगलात नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात मोठी चकमक झाली. या चकमकीत आतापर्यंत 32 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांना मोठं यश आलं आहे. नक्षलवाद्यांच्या विरोधातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. विशेष म्हणजे सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात अजूनही चकमक सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे चकमकीत मारल्या जाणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या चकमकीत पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवान जखमी किंवा कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण या कारवाईत पोलिसांना नक्षलवाद्यांकडील एके-47 सारखे अनेक हत्यार, तसेच स्फोटके बनवण्याचं सामान मिळाले आहे. सर्व हत्यार पोलिसांनी जप्त केले आहेत.
स्थानिक पोलिसांना नक्षलवाद्यांबद्दल महत्त्वाची माहिती मिळाली होती. नारायणपूर-दंतेवाडी सीमेवर माड परिसरात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांकडून संयुक्तरित्या अँट नक्शल ऑपरेशन सुरु करण्यात आलं. यावेळी नक्षलवाद्यांकडून पोलिसांच्या दिशेला गोळीबार सुरु करण्यात आला. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून गोळीबार सुरु केला. या चकमकीत आतापर्यंत 32 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
पोलीस मारलेल्या गेलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह शनिवारी नारायणपूरच्या मुख्यालयात घेऊन जातील. तिथे नक्षलवाद्यांची पुष्टी केली जाईल. दरम्यान, गेल्या आठ महिन्यांमध्ये वेगवेगळ्या चकमकीत आतापर्यंत 165 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
पोलिसांनी कारवाई नेमकी कशी केली?
बस्तर क्षेत्राचे बड्या पदावरील एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली की, नारायणपूर-दंतेवाडी जिल्ह्याच्या सीमेवरील थुलथुली गावातील जंगलात हे ऑपरेशन करण्यात आलं. या ऑपरेशनसाठी नारायणपूर आणि दंतेवाडी जिल्ह्यातील पोलिसांची कुमक पाठवण्यात आली होती. यामध्ये जिल्हा रिजर्व्ब गार्ड आणि एसटीएफच्या जवानांचा समावेश होता.
सर्च ऑपरेशन सुरु असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेला गोळीबार केला होता. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी अनेक नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आलं. तसेच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके, एके-47 रायफल आणि इतर हत्यारं मिळाली आहेत. संबंधित परिसरात अजूनही थांबून-थांबून फायरिंग होत आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.