चक्क ‘बजरंगबली’ हनुमानालाच पाण्याचं बिल पाठवलं; आता बिल भरणार कसं?; काय आहे संपूर्ण प्रकरण?
रायगड नगर पालिकेने अमृत मिशन योजने अंतर्गत आतापर्यंत अनेक घरांमध्ये नळ कनेक्शन दिलं आहे. या नळ कनेक्शनची संख्या 20 हजाराहून अधिक आहे.

रायपूर: छत्तीसगडच्या रायगडमध्ये एक विचित्रं प्रकरण समोर आलं आहे. शहरातील नगरपालिकेने चक्क बजरंगबली हनुमानालाच (hanuman) पाण्याचं बिल (water tax) पाठवल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. नगर पालिकेने पाठवलेल्या या नोटिशीत हनुमान मंदिरावर पाणी कर थकीत असल्याचं म्हटलं आहे. शहरातील वॉर्ड क्रमांक 18 दरोगापारा येथील हे प्रकरण आहे. विशेष म्हणजे या मंदिरात एक सुद्धा नळ कनेक्शन नाहीये. तरीही मंदिराला नोटीस पाठवण्यात आली आहे. नगर पालिकेच्या (minicipal corporation) या नोटिशीमुळे स्थानिकांमधून संताप व्यक्त केला जात असून त्यांनी पालिकेच्या या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदवला आहे.
रायगड नगर पालिकेने हनुमान मंदिराला 400 रुपये पाण्याचं बिल भरण्यासाठी नोटीस पाठवली आहे. मंदिर समितीने 15 दिवसाच्या आत कर भरावा. अन्यथा नगर पालिकेकडून कारवाई करण्यात येईल, असं नोटिशीत म्हटलं आहे. दुसरीकडे नगर पालिकेची नोटीस आल्यानंतर स्थानिकांनी पालिकेचा विरोध करण्यास सुरुवात केली आहे. कशाच्या आधारे नगर पालिकेने हनुमान मंदिराला नोटीस पाठवली आहे हे आकलनाच्या पलिकडचे आहे, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.
यावर नगर पालिकेचे अधिकारी नित्यानंद उपाध्याय यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वॉर्डात अमृत मिशन योजनेअंतर्गत घरांमध्ये नळांचं कनेक्शन देण्यात आलं होतं. मजुरांनी हे काम केलं होतं. त्याची पूर्ण माहिती घेण्यात आली होती. त्याची एन्ट्री संगणकात करण्यता आली आहे. त्याच क्रमानुसार हनुमान मंदिरालाही नोटीस पाठवण्यात आली आहे.
या परिसराचा सर्व्हे सुरू आहे. त्यानुसार कोणकोणत्या घरांमध्ये नळाचं कनेक्शन देण्यात आलं त्याची माहिती घेण्यात येणार आहे, असं उपाध्याय यांनी सांगितलं.

water bill
दरम्यान, या भागात अनेक ठिकाणी दूषित पाणी मिळत आहे. त्यामुळे स्थानिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे या उद्देशानेच प्रत्येक घरात नळाचं कनेक्शन दिलं जात आहे.
रायगड नगर पालिकेने अमृत मिशन योजने अंतर्गत आतापर्यंत अनेक घरांमध्ये नळ कनेक्शन दिलं आहे. या नळ कनेक्शनची संख्या 20 हजाराहून अधिक आहे.