प्रचारावेळी दारू, साड्या वाटप केल्यास काय होणार?; निवडणूक आयोगाचा इशारा काय?
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर घोषित झाला आहे. मुख्य निवडणूक आयुक्ती राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. तसेच त्यांनी यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने काही नियमही सांगितले. उमेदवार आणि राजकीय पक्षांनी द्वेष निर्माण करणारी भाषणं किंवा विधाने करू नये, फेक न्यूज पसरवू नयेत, नाहीतर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राजीव कुमार यांनी दिला आहे.
नवी दिल्ली | 16 मार्च 2024 : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यावेळी निवडणूक आयोगाने काही इशारेही दिले आहे. निवडणुकीत आम्ही हिंसेला थारा देणार नाही. हिंसा खपवून घेतली जाणार नाही. हिंसामुक्त निवडणुका घेण्यावर आमचा भर असणार आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं. तसेच या निवडणुकीत मतदारांना भुलवण्यासाठी पैसा, दारू आणि साड्यांचं वाटप केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच राजीव कुमार यांनी दिला आहे. पत्रकार परिषद घेऊन राजीव कुमार यांनी हा इशारा दिला आहे.
आमच्या समोर निवडणुकीत मनी आणि मसल पॉवर रोखण्याचं आव्हान आहे. पण आम्ही हे आव्हान पार पाडणार आहोत. मसल आणि मनी पॉवरचा निवडणुकीत वापर करणाऱ्यांवर आम्ही कठोर करावाई करू. निवडणुकीतील पैशाचा गैरवापर रोखण्यावर आमचा भर असणार आहे. निवडणुकीत कोणत्याही गैरव्यवहारावराला थारा राहणार नाही, अशी माहिती देतानाच खोट्या बातम्यांमागची सत्यताही तपासणार आहोत, त्यासाठी वेबसाईट तयार करणार आहोत, असं राजीव कुमार यांनी सांगितलं.
दोनदा मतदान नकोच
निवडणुकीत दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करणअयाचा इशारा त्यांनी दिला आहे. उमेदवारांची त्यांचा प्रचार जरूर करावा. पण कुणावरही वैयक्तिक टीका करू नका. राजकीय पक्षांनीही द्वेष निर्माण करणारे भाषण करू नयेत. विधाने करू नयेत. निवडणूक नियमांचं उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्या, असं आवाहन राजीव कुमार यांनी केलं आहे.
फेक न्यूज तपासल्या जाणार
निवडणूक आयोगाने अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. फेक न्यूज देणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. आयोग सत्य आणि असत्य याची माहिती देणरा आहे, अशी माहिती देतानाच निवडणुकीत विमानं आणि हेलिकॉप्टरमधून आलेल्या वस्तुंची तपासणी केली जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
घरीच मतदान करता येणार
देशात 85 लाखाहून अधिक वयोवृद्ध मतदार आहेत. त्यांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान करून घेणार आहोत. देशात पहिल्यांदाच असं होणार आहे. 85 वर्षाहून अधिक वयाचे मतदार आणि 40 टक्के दिव्यांग असलेल्या मतदारांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून फॉर्म भरून घेण्यात येईल आणि त्यांना घरीच मतदान करायला सांगितलं जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.