राजीनामा देणार नाही, जेलमधूनच सरकार चालवणार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात अडकलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडीच्या ताब्यात आहेत. त्यांनी जेलमधूनच जल मंत्रालयाला सूचना दिल्या आहेत. याचा भाजपने खरपूस समाचार घेतला आहे. काहीही झाले तरी राजीनामा देणार नाही, असे केजरीवाल यांनी आधीच सांगितले होते.
दारू घोटाळ्यात ईडीकडून अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडीची चौकशी सुरूच आहे. सीएम अरविंद केजरीवाल सध्या सहा दिवसांच्या ईडीच्या कोठडीत आहेत. 28 मार्चला ईडी केजरीवाल यांना कोर्टात हजर करणार आहे. त्यामुळे केजरीवालांची होळी ईडीच्या कोठडीतच जाणार आहे. काहीही झाले तरी मी राजीनामा देणार नाही, तुरुंगातूनच सरकार चालवणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी आधीच सांगितले होते. रविवारी त्यांनी तुरुंगातूनच जलमंत्रालयाबाबत सूचना जारी केली होती. जलमंत्र्यांना एका चिठ्ठीद्वारे त्यांनी ही सूचना दिली होती. उन्हाळा आला आहे, त्यामुळे दिल्लीतील जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, असे म्हटले आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या केजरीवाल यांच्या राजीनाम्याची भाजप सातत्याने मागणी करत आहे, परंतु दिल्लीचे मुख्यमंत्री राजीनामा देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे आणि ते कोठडीतून सरकार चालवत आहेत.
शनिवारी केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने देखील धक्का दिला. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या नव्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला होता. अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटक आणि कोठडीच्या विरोधात तात्काळ सुनावणीची मागणी केली होती, परंतु उच्च न्यायालयाने सांगितले की, आता बुधवारी न्यायालय सुरू होईल तेव्हाच या प्रकरणाची सुनावणी होईल.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या सूचनांमध्ये जलमंत्र्यांना लिहिले की, काही भागात पाणी आणि गटारांची समस्या आहे. मी तुरुंगात आहे पण दिल्लीच्या जनतेला त्रास होता कामा नये. योग्य संख्येने टँकरची व्यवस्था करावी. जलमंत्री आतिशी यांनी केजरीवाल यांच्या सूचना वाचून दाखवल्या, ज्यात पाणी टंचाई त्वरित भरून काढा, असेही लिहिले होते.
केजरीवालांच्या सूचनेवर भाजपचा टोला
केजरीवाल यांच्या सूचनेवर भाजप नेते मनोज तिवारी यांनी खरपूस समाचार घेत म्हटले की, 9 वर्षांनंतर केजरीवालांना पाण्याची आठवण झाली आहे. तुरुंगात गेल्यानंतर केजरीवाल चिंतेत आहेत. ते म्हणाले की, केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेचे नशीब भोगले आहे, ज्याची त्यांना शिक्षा होत आहे.