सरन्यायाधीशांची मोठी टिप्पणी, शिंदे की ठाकरे, कुणाचं टेन्शन वाढणार?
घटनापीठासमोर शिंदेंच्या शिवसेनेकडून वकील नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. अपात्रतेसंदर्भातलं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडेच द्या, असा युक्तिवाद कौल यांनी केलाय. तर सरन्यायाधीशांनीही एक टिप्पणी केली.
नवी दिल्ली : सत्तासंघर्षाच्या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेकडून (Shiv Sena) वकीलनीरज कौल यांनी युक्तिवादास सुरुवात केली. त्यानंतर सरन्यायाधीश आणि कौल यांच्यात सवाल-जवाब रंगले. यावेळी सरन्यायाधीशांनी महत्वपूर्ण टिप्पणीही केली. नवाब रेबिया प्रकरण नसतं, तर अध्यक्षांनी 39 जणांना अपात्र ठरवलं असतं आणि सरकार पडलं असतं असं सरन्यायाधीश म्हणाले. कौल यांनी युक्तिवाद करताना म्हटलंय की, तत्कालीन मुख्यमंत्री बहुमत चाचणीला सामोरे का गेले नाहीत? त्यावर, आम्ही 27 तारखेला अंतरिम आदेश दिला नसता तर अध्यक्षांनी आमदारांना अपात्र ठरवलं असतं असं कोर्ट म्हणालं. आणि तरीही राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावली असती का? असा सवालही सरन्यायाधीशांनी केला. तुमचं उत्तर सकारात्मक असेल तर मतदान कसं झालं हे तुम्हालाही माहित आहे. अध्यक्षांनी शिंदेंना अपात्र ठरवलं नाही म्हणूनच ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकले, असं सरन्यायाधीश म्हणाले.
त्यावर शिंदेंच्या शिवसेनेचे वकील नीरज कौल म्हणालेत की, ही सगळी गृहितकं आहेत. पण ही फक्त गृहितकं नाहीत, काय झालं हे सगळ्यांना माहित आहे, असं पुन्हा सरन्यायाधीश म्हणालेत. पुन्हा कौल यांनी युक्तिवाद करताना म्हटलंय की, विश्वासदर्शक ठरावावेळी मविआचे 13 लोक गैरहजर होते, म्हणूनच त्यांची संख्या 99 वर आली. हे घडलं कारण सरकारनं विश्वास गमावला होता. ‘नबाम रेबिया’नुसार अध्यक्ष अपात्रतेची कारवाई करु शकत नाहीत, असं कौल म्हणाले. त्यानंतर सरन्यायाधीशांनी आणखी महत्वपूर्ण टिप्पणी केली, ‘नबाम रेबिया’ नसतं तर अध्यक्षांनी 39 जणांना अपात्र ठरवलं असतं आणि हे सरकार पडलं असतं.
अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडेच द्या, अशी मागणीही शिवसेनेचे वकील नीरज कौल यांची आहे. पण त्यावरुन दोन्ही पक्षाच्या वकिलांमध्ये मतभेद आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचं म्हणणं की, सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे प्रकरण सोपवा. तर ठाकरे गटानं तत्कालीन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळांकडे अपात्रतेसंदर्भातला निकाल सोपवण्याची मागणी केली. शिंदेंच्या शिवसेनेकडून सलग 2 दिवस युक्तिवाद करण्यात केलाय. आता नीरज कौल यांच्यानंतर हरीश साळवे युक्तिवाद करतील. त्यामुळं गुरुवारी किंवा शुक्रवारपर्यंत सत्तासंघर्षाच्या प्रकरणाचा युक्तिवाद संपणार असं दिसतंय.