पटियाला: पंजाबच्या पटियालामध्ये शिवसेना (shivsena) कार्यकर्त्यांनी खलिस्तान (khalistan) मुर्दाबाद मार्चचं आयोजन केलं होतं. यावेळी खलिस्तान समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आले. त्यामुळे दोन्ही गटात जोरदार धुमश्चक्री उडाली. यावेळी दोन्ही बाजूने प्रचंड दगडफेक करण्यात आली. एकमेकांना मारहाण करतानाच नंग्या तलवारीही नाचवण्यात आल्या. त्यामुळे या परिसरात एकच तणाव निर्माण झाला आहे. या हाणामारीची घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जमावाला आवरताना पोलिसांच्याही (police) नाकीनऊ आले. शेवटी पोलिसांनी अधिक आक्रमकपणे जमावाला पांगवण्यात यश मिळवले. तसेच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. मात्र, या घटनेमुळे पटियालामध्ये तणावाची स्थिती आहे. दरम्यान, या हाणामारीत अनेकांना मार लागल्याचं सांगण्यात येत आहे. तर काही जणांना किरकोळ मार लागल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
शिवसैनिकांनी आज पटियाला येथे खलिस्तान मुर्दाबाद मार्चचं आयोजन केलं होतं. यावेळी अनेक शीख संघटना आणि हिंदू कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यानंतर पोलिसांना जमावाला पांगवण्यात तारेवरची कसरत करावी लागली. यावेळी पोलिसांसमोरच दोन्ही बाजूने दगडफेक करण्यात आली. काहींनी तर तलवारी काढून हवेत मिरवल्या. त्यामुळे आणखीनच तणावाचं वातावरण निर्माण झालं.
#WATCH | Punjab: A clash broke out between two groups near Kali Devi Mandir in Patiala today.
Police personnel deployed at the spot to maintain law and order situation. pic.twitter.com/yZv2vfAiT6
— ANI (@ANI) April 29, 2022
शिवसेनेचे पंजाबचे कार्यकारी अध्यक्ष हरिश सिंगला यांच्या नेतृत्वात आर्य समाज चौकात खलिस्तान मुर्दाबाद मार्चचं आयोजन केलं होतं. यावेळी शिवसैनिक खलिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पुढे जात होते. शिवसैनिक कधीही पंजाबमध्ये खलिस्तान होऊ देणार नाही. तसेच खलिस्तानचं कुठेही नाव देऊ देणार नाही, असं सिंगला यांनी सांगितलं. याच वेळी शीख संघटनेचे काही कार्यकर्ते तलवारी नाचवत आले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बऱ्याच प्रयत्नानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली.