अखेर मंत्रिमंडळ विस्तार होणार, मुहूर्तही ठरला; अमित शाह, शिंदे आणि फडणवीस यांच्यात अर्धा तास खलबतं
अमित शाह यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील दिला असला तरी नव्या विस्तारात किती मंत्र्यांना स्थान देणार याबाबतची माहिती गुलदस्त्यात आहे.
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्याचं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे जानेवारी महिन्यात राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रात्री उशिरा भेट घेतली. तिन्ही नेत्यांमध्ये यावेळी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली. यावेळी अमित शाह यांनी मंत्रिमंडळ विस्तार करण्यास हिरवा कंदील दर्शविला आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार लवकरच होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमावादावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिल्लीत पाचारण केले होते. यावेळी दोन्ही नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही काल दिल्लीतच होते. या बैठकीनंतर शिंदे आणि फडणवीस यांनी रात्री उशिरा अमित शाह यांची भेट घेतली. या तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
यावेळी राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्यात आली. राज्य हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करायचा की त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करायचा यावरही प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. मात्र, हिवाळी अधिवेशनानंतरच विस्तार करण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या वर्षात म्हणजे जानेवारीच्या अखेरीपर्यंत राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो.
अमित शाह यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील दिला असला तरी नव्या विस्तारात किती मंत्र्यांना स्थान देणार याबाबतची माहिती गुलदस्त्यात आहे. तसेच भाजप आणि शिंदे गटाच्या वाट्याला किती आणि कोणते मंत्रिपदे येणार याचीही माहिती देण्यात आलेली नाही.
शिवाय मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांना स्थान मिळणार का? तसेच मंत्रिमंडळ विस्तारासह महामंडळांचेही वाटप होणार का? याची माहितीही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.