मोठी बातमी ! एकनाथ शिंदे यांनी दोनदा शिवसेना सोडण्याचा प्रयत्न केला होता; कुणी केला गौप्यस्फोट?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यापूर्वी दोनदा शिवसेना सोडण्याचा प्रयत्न केला होता. पण दोन्ही वेळा त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता, असा दावा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला आहे.
लखनऊ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हे काही पहिलचं बंड नसल्याचं उघड झालं आहे. एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी दोनदा शिवसेना सोडण्याचा प्रयत्न केला होता. पण दोन्ही वेळा त्यांचं बंड फसलं होतं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनीच हा गौप्यस्फोट केला आहे. तर खासदार संजय राऊत यांनीही शिंदे यांच्या बंडाच्या या प्रयत्नाला पुष्टी दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच शिंदे यांच्या शिवसेना सोडण्याच्या हालचाली सुरू होत्या, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. उद्धव ठाकरे या ना त्या कारणामुळे मुख्यमंत्री होऊ नये म्हणून एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न सुरू होता. त्यांनी दोनवेळा शिवसेना सोडण्याचा प्रयत्न केला होता. आमदारही जमवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. कारण आपण कुठे तरी चुकतोय हे त्यांच्या मनाला बोचत होतं, असा गौप्यस्फोट आनंदराव अडसूळयांनी केलाआहे.
शिंदें मागे ईडी कुठे होती?
पैसा कुठून कुठपर्यंत गेला याचं उत्खनन करायाचं म्हटलं तर रस्ता मातोश्रीपर्यंत जातो. रिकामटेकड्या लोकांना वाईट गोष्टी सूचत असतात. काही लोकांच्या मागे ईडी जरूर लावली. मात्र एकनाथ शिंदेंच्या मागे कुठं ईडी लावली होती? असा सवाल अडसूळ यांनी केला.
गद्दारीची बीजं आधीच रोवली होती
संजय राऊत यांनीही शिंदे यांच्या बंडावर भाष्य केलं आहे. गद्दारीची बीजं गेल्या साडेतीन वर्षापासूनच रुजवली जात होती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही हा प्रकार सुरू होता. तेव्हा हे सर्व लोकं अहमद पटेलांना भेटून पक्ष सोडण्याच्या तयारी होते, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला. यावेळी राऊत यांनी अयोध्या दौऱ्यावरून शिंदे यांच्यावर हल्ला चढवला.
तुम्हाला रामाची आठवण आता का आली? पक्ष सोडला तेव्हा तुम्ही गुवाहाटीला गेला. तेव्हा रामाची आठवण आली नाही. गुवाहाटीऐवजी अयोध्येला जाऊन रामाला कौल लावायचा होता. महाराष्ट्रात गेल्या 72 तासापासून शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांचा हाहाकार उडाला आहे. नुकसानीसाठी सरकारने काही घोषणा केल्या होत्या. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सरकार हे धर्माच्या नावावर पर्यटनाला गेलं आहे. हे ढोंग आहे, असं ते म्हणाले.