झारखंडच्या राजकारणात वादळ घोंघावतंय, काँग्रेसचा 12 आमदारांचा गट नाराज, मोठा निर्णय घेणार?
झारखंडच्या राजकारणातील वादळ काही केल्या शमताना दिसत नाहीय. चंपई सोरेन यांच्या नेतृत्वात पुन्हा नवं सरकार स्थापन झाल्यानंतरही तिथे राजकीय हालचाली काही केल्या कमी होताना दिसत नाही. आता तर सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या 12 आमदारांमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे.
रांची | 18 फेब्रुवारी 2024 : झारखंडच्या राजकारणात पुन्हा वादळ घोंघावत असल्याची माहिती मिळत आहे. झारखंड सरकारमध्ये मंत्री न मिळाल्याने काँग्रेसच्या काही आमदारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याची माहिती मिळत आहे. या नाराज आमदारांची संख्या 12 आहे. यापैकी 8 आमदार नवी दिल्लीत आज दाखल झाले. ते पक्षश्रेष्ठींसोबत बातचित करुन आपली भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे नाराज आमदार बंगळुरुत जाण्याची शक्यता असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. या आमदारांकडून पक्षश्रेष्ठींकडे चार मंत्र्यांची तक्रार केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्याकडून या चार मंत्र्यांकडील मंत्रीपद काढून दुसऱ्या कुणाला संधी देण्यात यावी, अशी विनंती करण्यात येण्याची शक्यता आहे.
झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली आहे. ईडीच्या कारवाईमुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या राजीनाम्यानंतर प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या. राज्यपालांनी सरकार स्थापनेचा प्रस्ताव देण्यापासून ते सरकार स्थापन होईपर्यंत, तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत या घडामोडी सुरुच राहिल्या. त्यानंतर आतादेखील तशाच हालचाली घडत आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते चंपई सोरेन हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. पण त्यांच्या सरकारमधील आमदारांमध्ये धुसफूस असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे 12 आमदार हे मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा आहे. पण तरीही चंपई सोरेन यांच्या सरकारवर त्याचा काहीच परिणाम होणार नाही, असं स्वत: चंपई सोरेन यांनी म्हटलं आहे. आमचं गठबंधन मजबूत आहे, असं चंपई सोरेन म्हणाले आहेत.
चंपई सोरेन आणखी काय म्हणाले?
चंपई सोरेने यांना काँग्रेसच्या आमदारांच्या नाराजीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी हा काँग्रेसचा अंतर्गत विषय असल्याचं म्हटलं. त्यांनी त्यावर फार भाष्य करणं टाळलं. “हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे. ते यावर मार्ग काढतील. मला या विषयावर काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही. जेएमएम आणि काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही. सर्व ठीक सुरु आहे”, अशी प्रतिक्रिया चंपई सोरेन यांनी दिली आहे.
काँग्रेस आमदारांच्या नाराजीचं नेमकं कारण काय?
काँग्रेसच्या 12 आमदारांनी मागणी केली आहे की, मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या काही मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात यावी. तसं न केल्यास 23 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या आगामी विधानसभेच्या अधिवेशनावर बहिष्कार टाकणार आणि जयपूरला जाणार, असा इशारा काँग्रेसच्या आमदारांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आलमगीर आलम, रामेश्वर उराँव, बन्ना गुप्ता आणि बादल पत्रलेख यांना पुन्हा मंत्रीपद देण्यात आल्याने काँग्रेस आमदारांचा एक मोठा गट नाराज असल्याची माहिती मिळत आहे.