बिहार निवडणुकीपूर्वी चिठ्ठी, बंगाल निवडणुकीआधी बैठक; काँग्रेसच्या ‘त्या’ नेत्यांचं चाललंय काय?

| Updated on: Mar 01, 2021 | 2:16 PM

पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर होताच काँग्रेसमधील दिग्गज नेते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. (Congress ‘getting weaker’, G-23 leaders meet in Jammu)

बिहार निवडणुकीपूर्वी चिठ्ठी, बंगाल निवडणुकीआधी बैठक; काँग्रेसच्या त्या नेत्यांचं चाललंय काय?
काँग्रेस नेते
Follow us on

नवी दिल्ली: पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर होताच काँग्रेसमधील दिग्गज नेते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी हायकमांडला चिठ्ठी लिहून खळबळ उडवून दिल्यानंतर आता पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच काँग्रेसच्या या नेत्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये एक बैठक घेतली. आम्ही काँग्रेस पक्षासोबत आहोत. पण पक्षात जे काही चाललं आहे, ते आम्हाला मान्य नाही, असं या नेत्यांनी ठणकावून सांगितलं आहे. विधानसभा निवडणुका आणि या नेत्याचं टायमिंग यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Congress ‘getting weaker’, G-23 leaders meet in Jammu)

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वात जम्मू-काश्मीरमध्ये शांती संमेलन पार पडलं. यावेळी काँग्रेस हायकमांडला चिठ्ठी लिहून उघड उघड पक्षाविरोधात भूमिका घेणाऱ्या 20 नेत्यांपैकी 8 नेते उपस्थित होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या बैठकीला आझाद यांच्यासह भूपेंद्रसिंग हुड्डा, कपिल सिब्बल, आनंद शर्मा, राज बब्बर, मनिष तिवारी आणि विवेक तन्खासहीत अन्य काही नेते उपस्थित होते. गांधी ग्लोबल नावाच्या या मंचावर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे फोटो नव्हते. या मंचावर दोन्ही नेत्यांचे फोटो नसणे हा केवळ योगायोग नसून गांधी कुटुंबाला दिलेला हा सूचक इशारा आहे, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

सोनिया-राहुल विरोधात बिगूल?

आझाद यांनी या शांती संमेलनाच्या माध्यमातून त्यांच्या समर्थकांना एकत्र केल्याचं बोललं जात आहे. या मंचावर काँग्रेस कमकुवत होत असल्याचं सांगून त्याला अप्रत्यक्षपणे हायकमांडला दोषी धरण्यात आलं आहे. एवढेच नव्हे तर या मंचावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुती सुमनेही उधळण्यात आली होती. या मंचावरून कपिल सिब्बल यांनी तर सत्य बोलण्याची हीच वेळ असल्याचं म्हटलं होतं. खरं बोलण्याची हीच वेळ आहे. आम्ही सत्य बोलणारच आणि काँग्रेस कमकुवत होत चालली आहे, हेच सत्य आहे. त्यामुळेच आम्ही एकत्र आलो आहोत. पूर्वीही एकत्र होतो. आताही एकत्र येऊन काँग्रेसला मजबूत करणार आहोत, असं सिब्बल म्हणाले होते. त्यामुळे ही बैठक म्हणजे सोनिया आणि राहुल गांधी यांच्याविरोधातील बंडाचे निशाण तर नाही ना? असा सवालही केला जात आहे.

मोदींची स्तुती

यावेळी गुलाम नबी आझाद यांनी स्वत: मोदींची स्तुती केली होती. बऱ्याच नेत्यांच्या चांगल्या गोष्टी मला आवडतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही त्यापैकी एक आहेत. मोदी म्हणतात मी भांडी घासायचो आणि चहा विकायचो. आपण चहा विकायचो हे ते बिनदिक्कतपणे सांगतात हीच गोष्ट मला त्यांची आवडते. आपल्या जुन्या दिवसांना मोदी विसरलेले नाहीत, असं आझाद म्हणाले होते. राजकारणात आम्ही मोदींच्या विरोधात आहोत. पण कमीत कमी ते आपलं वास्तव तरी लपवत नाहीत, असंही ते म्हणाले होते. त्यामुळे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या होत्या.

प्रचार करायला हवा

काँग्रेस नेते आणि राज्यसभा सदस्य अभिषेक मनू सिंघवी यांनी मात्र काँग्रेसच्या या नेत्यांवर टीका केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये रॅली करणारे नेते खूप मोठे आहेत. आदरणीय आहेत. ते काँग्रेसचे अभिन्न अंगही आहेत,. मात्र, त्यांनी पाच राज्यात जाऊन प्रचार केला पाहिजे. या राज्यांमध्ये काँग्रेसला संघर्ष करावा लागत आहे. तिथे जाऊन या नेत्यांनी पक्षाला बळ द्यायला हवं. आझाद यांच्यासह सर्वचजण या पाच राज्यात काँग्रेससाठी राबले असते तर अधिक चांगलं झालं असतं आणि पक्षही मजबूत झाला असता, असा टोला सिंघवी यांनी लगावला आहे.

दबावाचं राजकारण

दरम्यान, काही राजकीय विश्लेषकांच्या मते आझाद हे आपल्या समर्थकांसह दबावाचं राजकारण करत आहेत. पक्षात स्थान आणि सन्मान मिळविण्यासाठी आझाद यांचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. मात्र, असं असलं तरी काँग्रेसकडून या नेत्यांवर सध्या तरी कोणतीही कारवाई होण्याची शक्यता नाही. तशी कारवाई करणे पक्षाला परवडणारही नाही, असंही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. (Congress ‘getting weaker’, G-23 leaders meet in Jammu)

 

संबंधित बातम्या:

आम्ही फारकाळ जगणार नाही, प्रथम तरुणांना लस द्या; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे वक्तव्य

बंगालमध्ये पुन्हा ममता दीदी?, केरळमध्ये भाजपला भोपळा? वाचा कोणत्या राज्यात कोणाची सत्ता येणार?

Congress G23: ‘आम्ही काँग्रेसचा सुवर्णकाळ पाहिलाय, आता उतारवयात पक्षाची दुर्बलता पाहायची इच्छा नाही’

(Congress ‘getting weaker’, G-23 leaders meet in Jammu)