आणखी एका राज्यात काँग्रेसचं सरकार पडणार? 9 आमदारांच्या क्रॉस वोटिंगने सस्पेन्स वाढला
महाराष्ट्रात दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर बिहारमध्ये देखील सत्तांतर घडून आलं. याशिवाय अशाप्रकारच्या सत्तांतराच्या घटना याआधीही घडून आल्या आहेत. झारखंडमध्ये तर जोरदार हालचाली घडताना दिसत आहेत. त्यानंतर आता आणखी एका राज्यात राजकीय भूकंपाचे संकेत मिळताना दिसत आहेत.
शिमला | 27 फेब्रुवारी 2027 : हिमाचल प्रदेशच्या राजकारणात वादळ घोंघावत आहे. कारण हिमाचलच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आलाय. देशभरातील राज्यसभेच्या विविध ठिकाणच्या जागांसाठी आज मतदान पार पडलं. या निवडणुकीचा निकाल आजच जाहीर होणार आहे. हिमाचलमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी आज मतदान पार पडलं. या निवडणुकीत भाजपच्या बाजूने काँग्रेसचे 6 आणि 3 अपक्ष आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे ही भाजपची मोठी खेळी असल्याचं मानलं जात आहे. इंद्रजीत लखनपाल, चैतन्य शर्मा, सुधीर शर्मा,राजेंद्र राणा, देवेंद्र सिंह भुट्टो, रवी ठाकुर असे काँग्रेसचे 6 आणि आशीष शर्मा, के एल ठाकुर और होशियार सिंह असे अपक्ष 3 आमदार या सर्वांनी क्रॉस वोटिंग केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
या 9 आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यानंतर ते विधान भवनातून गायब झाले, अशी चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे या सर्व आमदारांनी हिमाचल प्रदेशच्या बाहेर जाण्याचीदेखील तयारी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार जिंकला तर भाजप मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या नेतृत्वातील सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपचा उमेदवार जिंकला तर…
राज्यसभेत काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला तर त्यांच्या 9 आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. असं असताना भाजपचा उमेदवार जिंकला तर भाजप लगेच काँग्रेस सरकारच्या विरोधात सभागृहात अविश्वासाचा प्रस्ताव आणणार आहे. हिमाचल प्रदेशात 68 आमदारांनी शिमला येथे विधानसभेत आज राज्यसभेच्या एका जागेच्या निवडणुकीसाठी मतदान केलं. काँग्रेसकडे सध्या 40 जागा आहेत. तसेच 3 अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. तसेच या सर्वांनी काँग्रेसच्या कालच्या आमदारांच्या बैठकीत भाग घेतला होता.
काँग्रेसचे काही आमदार नाराज?
हिमाचलच्या राज्यसभेच्या एका जागेसाठी भाजपकडून हर्ष महाजन तर काँग्रेसकडून अभिषेक मनु सिंघवी यांच्यात लढत होत आहे. हर्ष महाजन हे दिवंगत माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. ते 2022 मध्ये भाजपात सहभागी झाले. त्याआधी ते काँग्रेसमध्ये असताना दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच त्यांनी मंत्रिपद भूषविलं आहे. ते विधानसभेचे अध्यक्ष देखील होऊन गेले आहेत. मतदानानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे काही आमदार नाराज आहेत, अशी प्रतिक्रिया दिली.
दुसरीकडे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “आमच्याकडे 40 आमदार आहेत. आम्हाला 40 मतं मिळतील. मला असं वाटतं की, काँग्रेसच्या विचारधारेवर निवडून आलेल्या आमदारांनी पक्षाच्या समर्थनार्थ मतदान केलं असेल”, असं सुक्खू म्हणाले आहेत. तर हिमाचलचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते जयराम ठाकुर यांनी काँग्रेसला धडकी भरेल अशी प्रतिक्रिया दिलीय. “काँग्रेस सरकारकडे आवश्यक समर्थन नाही. उद्या बजेट आहे. आम्ही वाट पाहू आणि बघू परिस्थिती काय आहे. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ”, असं जयराम ठाकुर म्हणाले आहेत.