सत्यजित तांबे वादावर काँग्रेस नेत्यांची संजय राऊत यांच्याशी चर्चा?; राऊत नेमकं काय म्हणाले?
कसबा आणि चिंचवड निवडणुकीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. निवडणुका होणारच आहे. मुख्यमंत्र्यांना आवाहन करू द्या किंवा अन्य कुणालाही आवाहन करू द्या.
नवी दिल्ली: काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये झालेल्या गोंधळावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. या प्रकरणी काँग्रेसच्या नेत्यांनी माझं मत विचारात घेतल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मा, कोणत्या कोणत्या नेत्यांनी हे मत विचारलं आणि काय चर्चा झाली हे त्यांनी सांगितलं नाही. राज्यात तांबे प्रकरण गाजत असतानाच राऊत यांनी मोठं विधान केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्याविषयावर माझं मत घेतलं. काँग्रेस नेते आणि आम्ही एकमेकांना भेटत असतो. तेव्हा राज्यातील घडामोडींविषयी चर्चा होत असते. या प्रकरणावर अधिक बोलायला मी काही काँग्रेसचा अॅथोरिटी नाही, असं संजय राऊत म्हणाले.
ते माणुसकीला धरून नाही
नेत्याच्या आजाराचा गैरफायदा घेऊन त्याच्याविरोधात कारवाई करणं अमानूष आहे. उद्धव ठाकरे आजारी असताना बंडाच्या नावाखाली जे कारस्थान झालं. तसंच इतर कोणत्या पक्षात होत असेल तर ते माणुसकीला धरून नाही, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
देशाची अवस्था काय झाली?
यावेळी त्यांनी नाणारच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. काल त्यांनी च वर जोर देऊन सांगितलं. आणणारचं. तिथल्या जनतेच्या भूमिका आणि भावना समजून घेतल्या पाहिजे.
एखाद्या उद्योगपती किंवा परदेशी कंपनीला कंत्राट देण्यासाठी भाजपचे लोकं च वर जोर देऊन आणणारच, करणारच असं म्हणत आहे. अशा गोष्टीमुळे या देशाची काय अवस्था झाली ते पाहातच आहात. त्यामुळे च वर जोर देऊन चालणार नाही, असं ते म्हणाले.
तर आम्ही यादी जाहीर करू
नाणारच्या अवतीभोवती ज्यांनी जमिनी घेतल्या आहेत, त्यांची फडणवीस यांनी यादी जाहीर करावी. त्या जमिनदारांसाठी नाणारचा प्रकल्प आणला जातोय. ही गुंतवणूक कोणाची आहे? गुंतवणूकदार कोण आहे? कुणाचा पैसा आहे? त्याची यादी जाहीर करा. नाही तर आम्ही यादी जाहीर करू. तरच च वर जोर द्यावा, असं आव्हानच त्यांनी दिलं.
भागवत यांना टोला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी भागवत यांचं मत वाचलं. हळुहळू संघ बदलत आहे. स्वत:ची विचारसरणी बदलत असेल, जातधर्म विरहित राजकारण करत असेल तर त्यांनी सर्वात आधी हा मंत्र भाजपला दिला पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.
निवडणुका होणारच
कसबा आणि चिंचवड निवडणुकीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. निवडणुका होणारच आहे. मुख्यमंत्र्यांना आवाहन करू द्या किंवा अन्य कुणालाही आवाहन करू द्या. निवडणुका होणारच. त्या आव्हानाला काही अर्थ नाही. दोन्ही निवडणुका होतील. मतभेद नाही. एकत्र लढण्याला आम्ही ठाम आहोत, असंही ते म्हणाले.