नवी दिल्ली | 20 सप्टेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडल्यानंतर आज लोकसभेत या विधेकावर चर्चा झाली. काँग्रेसने या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. पण तरीही हे विधेयक काही गोष्टींमुळे अपूर्ण आहे, असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी आज लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी या आरक्षणात ओबीसी आरक्षणाचा उल्लेख नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारवर चांगलाच घणाघात केला. तसेच महिला आरक्षण विधेयक आत्ताच का लागू करत नाहीत? असा सवाल राहुल गांधींनी सरकारला केला.
“स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षण मोठं पाऊल होतं. महिला आरक्षण विधेयक आत्तापासून लागू का करत नाही? जातीय जनगणनेपासून लक्ष वळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. आपल्या संस्थांमध्ये ओबीसींना अतिशय कमी स्थान आहे. देशातील 90 पैकी केवळ 3 सचिव हे ओबीसी आहेत”, असं राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले.ट
“मी आज महिला आरक्षण विधेयकावर बोलण्यासाठी उभा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षण मोठं पाऊल होतं. स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे लोकांना अधिकार देणं. पण माझ्या नरजेसमोर हे विधेयक अपूर्णच आहे. मोदी सरकारच्या भाषेत मला अहंकार दिसतोय”, अशी टीका राहुल गांधींनी केली.
“या विधेयकात ओबीसी आरक्षणाचा उल्लेख असायला हवा होता. पण तो उल्लेख गायब आहे. जनगणना होण्याआधी या विधेयकाला लागू करायला हवं. हा कार्यक्रम चांगला आहे. पण आजच्या कार्यक्रमात देशाच्या महिला राष्ट्रपतींना देखील असायला हवं होतं. विरोधी पक्ष जेव्हा जातीनिहाय जनगणनेचा मागणी करतो, तेव्हा सरकारकडून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो”, असं राहुल गांधी म्हणाले.
“महिलांना आणखी जागा मिळायला हव्यात. मी या विधेयकाचं समर्थन करतो पण हे विधेयक अजून अपूर्ण आहे. या विधेयकात ओबीसी आरक्षणाबाबत काहीच उल्लेख नाही. केंद्र सरकारच्या विविध संस्थांमध्ये असणाऱ्या 90 सचिवांपैकी किती सचिव हे ओबीसी समाजाचे आहेत? मी सांगतो, 90 पैकी फक्त 3 ओबीसी सचिव आहेत”, असं राहुल गांधी म्हणाले.