कमलनाथ मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री!
भोपाल : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी कमलनाथ यांची निवड झाली आहे. कमलनाथ यांच्या नावाची भोपाळमधील काँग्रेस कार्यालयात अधिकृत घोषणा करण्यात आली. गुरुवारी दिवसभर दिल्लीत राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाच्या नावाबाबत खलबतं सुरु होती. अखेर कमलनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. मध्य प्रदेशातील आमदारांनी एकमताने विधीमंडळ नेता म्हणून कमलनाथ यांची निवड केली. त्यानंतर काँग्रेसकडून अधिकृतरित्या घोषणा […]
भोपाल : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी कमलनाथ यांची निवड झाली आहे. कमलनाथ यांच्या नावाची भोपाळमधील काँग्रेस कार्यालयात अधिकृत घोषणा करण्यात आली. गुरुवारी दिवसभर दिल्लीत राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाच्या नावाबाबत खलबतं सुरु होती. अखेर कमलनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.
मध्य प्रदेशातील आमदारांनी एकमताने विधीमंडळ नेता म्हणून कमलनाथ यांची निवड केली. त्यानंतर काँग्रेसकडून अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली की, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ असतील.
Our best wishes to Shri @OfficeOfKNath for being elected CM of Madhya Pradesh. An era of change is upon MP with him at the helm. pic.twitter.com/iHJe43AB9v
— Congress (@INCIndia) December 13, 2018
कोण आहेत कमलनाथ?
विद्यमान मध्य प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ हे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचं शिक्षण दून स्कूलमध्ये झालं. 1980 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. मध्य प्रदेशातील छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून ते आतापर्यंत तब्बल आठ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
मे 1996 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर हवाला प्रकरणात कमलनाथ यांचं नाव आल्याने निवडणूक लढता आली नाही. या परिस्थितीमध्ये त्यांच्य पत्नी अलका कमलनाथ यांनी निवडणूक लढवली आणि त्या निवडून आल्या. 1997 च्या पोटनिवडणुकीत कमलनाथ मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्याविरुद्ध लढले मात्र, या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.
कमलनाथ पहिल्यांदा 1991 मध्ये वन आणि पर्यावरण मंत्री बनले. त्यांनी वस्त्रोद्योग राज्यमंत्री, केंद्रीय उद्योग मंत्री, केंद्रीय परिवहन मंत्री, शहर विकास मंत्री, संसदीय कामकाज मंत्री अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
कमलनाथ यांच्यावर सहा महिन्यांपूर्वीच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती आणि त्यांनी ती यशस्वीपणे पेलली. 15 वर्षांपासून मध्य प्रदेशात वनवासात असलेल्या काँग्रेसला त्यांनी अच्छे दिन आणले. कमलनाथ यांना प्रत्येक वर्गात मानलं जातं.
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची बाजी
मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. ईशान्य भारतात हातात असलेलं एकमेव राज्य गमावलं असलं तरी हिंदी भाषिक तीन राज्यांमध्ये काँग्रेसने भाजपला चितपट केलंय. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान ही तीन राज्य काँग्रेसने भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेतली आहेत. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने बहुमत मिळवलंय, तर मध्य प्रदेशात इतर पक्षांची मदत काँग्रेसला घ्यावी लागणार आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर मध्य प्रदेशातील चित्रही स्पष्ट झालं. मध्य प्रदेशात गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला 109 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
मध्य प्रदेश (230) :
- काँग्रेस – 114
- भाजप -109
- बसपा – 02
- सपा – 01
- इतर – 04
दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने 11 डिसेंबरच्या रात्रीच राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. सर्वात मोठा पक्ष या नात्याने सत्तास्थापनेची संधी देण्यात यावी, असं काँग्रेसने म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
मध्य प्रदेशात भाजपला काँग्रेसने नाही, ‘नोटा’ने हरवलं!
कमलनाथ की ज्योतिरादित्य शिंदे? मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कोण?
मध्य प्रदेशातही भाजपने हात टेकले, तब्बल 15 वर्षांनी शिवराज सिंहांचा राजीनामा
अखेर मध्य प्रदेशातील अंतिम निकाल जाहीर!
काँग्रेसने मध्य प्रदेशातही भाजपला मागे टाकलं, तीन राज्य हिसकावून घेतली!