MP Congress Candidate List : रामायणातील हनुमान भाजपच्या मुख्यमंत्र्यांविरोधात लढणार; मध्यप्रदेशातील रणभूमी कोण गाजवणार?
पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यापैकी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगानामधील निवडणुकांची काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे. या निवडणुकीत काँग्रेसने अनेक दिग्गजांना निवडणूक उतरवलं आहे. त्यामुळे या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत.
नवी दिल्ली | 15 ऑक्टोबर 2023 : काँग्रेसने मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाना विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली आहे. मध्यप्रदेशातील छिंदवाडामधून काँग्रेस नेते कमलनाथ निवडणूक लढवणार आहेत. तर बुधनी येथून भाजप नेते आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान निवडणूक लढणार आहेत. मात्र, काँग्रेसने शिवराज सिंह चौहान यांना चांगलीच डोकेदुखी दिली आहे. काँग्रेसने बुधनी येथून रामायण या लोकप्रिय मालिकेतील हनुमानाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्याला तिकीट दिलं आहे. त्यामुळे शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं असून भाजप ही निवडणूक कशी हाताळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काँग्रसने अभिनेते विक्रम मास्ताल यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. मास्ताल यांना बुधनी येथून तिकीट देण्यात आलं आहे. मास्ताल हे लोकप्रिय अभिनेते आहेत. 2008मध्ये आलेल्या रामायण मालिकेत मास्ताल यांनी हनुमानाची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांची ही व्यक्तिरेखा अधिकच गाजली होती. हिंदुत्वाचा पुरस्कार आणि रामानामाचा जयघोष करणाऱ्या भाजपसमोर आता मालिकेतील हनुमानाचं आव्हान उभं राहिल्याने बुधनी येथील निवडणूक अतिशय चुरशीची ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मध्यप्रदेशात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोविंद सिंह लाहर हे सुद्धा निवडणूक लढणार आहेत. तर इंदौर-1 या मतदारसंघातून काँग्रेसने भाजपचे उमेदवार कैलास विजयवर्गीय यांच्या विरोधात संजय शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे. शुक्ला यांची ही पारंपारिक सीट आहे. तसेच ते या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे कैलास विजयवर्गीय यांना विजयासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार असल्याचं चित्र आहे.
बघेल लढणार
छत्तीसगडमधील उमेदवारांची पहिली यादीही जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल हे पाटनमधून लढणार आहेत. बघेल हे पाटनचे विद्यमान आमदार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव हे अंबिकापूर येथून निवडणूक लढणार आहेत. छत्तीसगडमधील 90 जागांसाठी निवडणूक होत आहे.
तेलंगानातून रेड्डी
काँग्रेसने तेलंगाना प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ए रेवंत रेड्डी यांना कोडनगल विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आहे. तेलंगानात विधानसभेच्या 40 जागा आहेत.
तीन राज्यात फक्त पाच मुस्लिम
काँग्रेसने तीन राज्यांतील पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी एका मुस्लिम व्यक्तीला तिकीट दिलं आहे. तर तेलंगनामध्ये तीन मुस्लिम व्यक्तींना तिकीट देण्यात आलं आहे. म्हणजे तीन राज्यातील 229 उमेदवारांपैकी फक्त पाच मुस्लिम उमेदवारांना काँग्रेसने तिकीट दिलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, ही पहिली यादी आहे. अजून दुसरी आणि तिसरी यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे यात मुस्लिमांना अधिकाधिक तिकीट दिला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या जाहीर झालेल्या यादीत विद्यमान आमदारांनाच तिकिट देण्यात आले आहे. त्यामुळे त्यात मुस्लिम नेत्यांची नावे दिसत नसल्याचं सांगितलं जात आहे.
निवडणुका कधी?
मध्यप्रदेशातील 230 जागांवर 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये 90 जागांवर दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 7 आणि दुसऱ्या टप्प्यात 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तेलंगानात सर्वच्या सर्व 119 जागांवर 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी पाचही राज्यात मतमोजणी होणार आहे.