सावरकर समझा क्या… नाम- राहुल गांधी है… काँग्रेसच्या ट्विटर भाजप नेते भडकले, म्हणाले…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची काल दिल्ली पोलिसांनी भेट घेतली. श्रीनगरमधील वादग्रस्त विधानावर त्यांचं म्हणणं पोलिसांनी जाणून घेतलं. त्यानंतर काँग्रेसने ट्विट करत भाजपवर निशाणा साधला. काँग्रेसने ट्विटमध्ये सावरकरांचं नाव घेतल्याने भाजप नेते संतापले आहेत.
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी श्रीनगरमध्ये केलेल्या विधानावरून त्यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस बजावली आहे. राहुल गांधी यांना त्यांबाबतची डिटेल्स देण्याची किंवा खुलासा करण्याचे या नोटिशीत बजावले होते. पण राहुल गांधी यांनी नोटिशीला उत्तर न दिल्याने काल दिल्ली पोलीस त्यांच्या घरी गेली होती. पोलिसांशी चर्चा केल्यानंतर राहुल गांधी त्यांच्या घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली. काँग्रेसने तर ट्विट करून सावरकर समझा क्या… नाम- राहुल गांधी है… असं ट्विट करून भाजपला डिवचलं. त्यामुळे भाजप नेते संतापले आहेत. त्यांनीही काँग्रेसला जशास तसे उत्तर देणे सुरू केले आहे.
पोलिसांनी काल राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राहुल गांधी त्यांची कार घेऊन घराबाहेर पडले. स्वत: ड्राईव्ह करत ते बाहेर पडले. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजून 19 मिनिटांनी काँग्रेसने राहुल गांधी यांचा कार ड्राईव्ह करतानाचा फोटो ट्विट केला. त्यावर एक कॅप्शन दिलं. सावरकर समझा क्या… नाम- राहुल गांधी है… असं ट्विट करून काँग्रेसने भाजपच्या जखमेवर मीठ चोळलं.
हात जोडतो
काँग्रेसच्या या ट्विटर कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कृपया महान आत्मा वीर सावरकर यांचा अपमान करू नका. हात जोडून तुम्हाला विनंती करतो. ज्याला त्यागाचं महत्त्व समजतं तोच मनुष्याच्या चारित्र्याची महानता समजू शकतो, असं रिजिजू यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसची मानसिक दिवाळखोरी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी लोकशाहीच्या मर्यादेचं उल्लंघन केलं आहे. काँग्रेस पक्षाचं मानसिक दिवाळखोरी निघाली आहे. काँग्रेसला कोणतीच विचारधारा नाहीये. एका कुटुंबापलिकडे ते विचार करत नाहीत. भाजपला विचारधारा आहे. त्यामुळेच आम्ही सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हे सूत्र घेऊन काम करत असतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.
सावरकर समझा क्या… नाम- राहुल गांधी है pic.twitter.com/QFGsAJSxeo
— Congress (@INCIndia) March 19, 2023
सावरकरांचे भक्त नाही
अदानी यांची चौकशी करण्याऐवजी राहुल गांधी यांची चौकशी केली जात आहे. अदानी मुद्द्यावरून वाचण्यासाठी आणि लक्ष विचलीत करण्यासाठी ढोंग केलं जात आहे. मालकाला वाचवण्यासाठी संपूर्ण सरकार मैदानात उतरलं आहे. आम्ही अदानीच्या मुद्द्यावर पंतप्रधानांना प्रश्न विचारले. त्यामुळे संतप्त झालेल्या हुकूमशहाने आमच्यावरच पोलीस पाठवले. त्यांना वाटतं आम्ही घाबरून जाऊ. माफी मागू. आम्ही तुमची हुकूमशाही सहन करू. पण लक्षात ठेवा आम्ही सावरकरांचे भक्त नाही. बापूंचे अनुयायी आहोत. आम्ही घाबरणार नाही, पराभूत होणार नाही. लढू आणि जिंकूही, असं काँग्रेसने म्हटलं आहे.