तुमची आजी संविधान विरोधी होती का?; श्रीकांत शिंदे यांचा थेट राहुल गांधी यांना सवाल
संविधानाचं आर्टिकल 45मध्ये 10 वर्षाच्या आत देशातील 14 वर्षाखालील मुलांना शिक्षणाचा अधिकार द्यावा असं म्हटलं होतं. पण हा अधिकार मिळाला नाही. त्यासाठी 50 वर्ष लागले. पण आमच्या सरकारने हा अधिकार दिला. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. पण काँग्रेसला अंगठेबहाद्दर लोक हवे होते. म्हणूनच ते शिक्षणाचा अधिकार देऊ शकले नाही, असा हल्लाच श्रीकांत शिंदे यांनी चढवला.
संविधानाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चांगलेच धारेवर धरले. तुम्ही संविधानावरील चर्चेला आला आहात. चर्चा करत आहात. पण संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा साधा उल्लेखही तुमच्या भाषणात आला नाही, असा घणाघाती हल्लाच श्रीकांत शिंदे यांनी चढवला. तर पुढच्याच मिनिटाला तुमच्या आजी इंदिरा गांधी संविधान विरोधी होत्या का? असा खरमरीत सवालच श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधी यांना विचारला.
संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने संसदेत संविधानावर चर्चा होत आहे. या चर्चेत भाग घेताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी हा सवाल केला आहे. मी राहुल गांधी यांचं भाषण ऐकलं. राहुल गांधी यांनी संविधान सोडून सर्व गोष्टींवर प्रकाश टाकला. गेल्यावेळी अभय मुद्रावर बोलत होते. आताही त्यावरच बोलले. त्याच्या बाहेर आले नाही. अभय मुद्रा अहिंसा शिकवते, असा चिमटा श्रीकांत शिंदे यांनी काढला. श्रीलंकेने तीनदा संविधान बदललं, पाकिस्तान सहा वेळा, नेपाळने पाच वेळा, पण आपलं संविधान मजबूत आहे. संविधानाची चर्चा बाबासाहेब आणि गांधींशिवाय होत नाही. पण काँग्रेस नेत्यांनी संविधानाची चर्चा करताना बाबासाहेबांचं नावही घेतलं नाही. बाबासाहेबांचा विरोध त्यांचा कायम आहे. बाबासाहेबांना काँग्रेसने दोनदा पराभूत केलं होतं, असा हल्लाच त्यांनी चढवला.
एकही दंगल झाली नाही
1984 मध्ये शिखांविरोधात नॉन स्टॉप हिंसा करण्याचं काम यांनी केलं. हे विसरू नका. तरुणांचे अंगठे कापत होते. 1964मध्ये 1 हजार 70 जातीय दंगली काँग्रेसच्याच काळात झाल्या. कारसेवकांवर यांनी गोळ्या चालवल्या. 1993 मधला बॉम्बस्फोट यांच्या काळात झाला. गेल्या 10 वर्षात देशात एकही बॉम्ब स्फोट झाला नाही, याकडेही श्रीकांत शिंदे यांनी लक्ष वेधले.
ठाकरे गटाला सावरकरांचा अपमान मान्य आहे का?
हे सावरकरांचा अपमान करतात. ठाकरे गटाला मान्य आहे का? पळाले वाटतं सभागृहातून. कोणी नाही वाटतं, असा चिमटाही त्यांनी काढला. मी तुम्हाला तुमची आजी इंदिरा गांधी यांचं एक विधान सांगतो. रिस्पॉन्डिंग टू लेटर या पुस्तकाचे लेखक पंडित बाखले यांच्यासोबत इंदिहा गांधी यांचा पत्रव्यवहार झाला होता. बाखले हे सावरकर स्मारकाचे सेक्रेटरी होते. 1980मधलं हे पत्र आहे. त्यात इंदिरा गांधी म्हणतात, मला तुमचं पत्र मिळालं. सावरकरांनी इंग्रजांविरोधात लढा दिला. ते भारताचे सुपुत्र होते. मला आता हे विचारायचं आहे की, तुमची आजी इंदिरा गांधी सुद्धा संविधान विरोधी होती का? असा सवाल शिंदे यांनी केला. तुम्हाला सावरकरांवर काहीही बोलण्याची सवय आहे. मला वाटतं सावरकरांची पूजा आम्ही करत असतो. आम्हाला सावरकरांचा अभिमान आहे, असंही ते म्हणाले.
काँग्रेसला 400 वरून 40 वर आणलं
आज आपण संविधानावर चर्चा करत आहोत. आपण इथे बसलो त्याचं श्रेय संविधानाला आहे. याच संविधानाने सामान्य कुटुंबातील नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवलं. तर रिक्शा चालवणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवलं. याच संविधानाने काँग्रेसला 400 वरून 40वर आणलं, असंही ते म्हणाले. तसेच राहुल गांधी यांच्या हातातील संविधान पाहून हे कोणतं संविधान आहे असा सवालही केला. याच संविधानाच्या ताकदीने महाराष्ट्रातील लोकांनी आम्हाला मोठं मँडेट दिलं. महाविकास आघाडी विरोधी पक्षनेता बनवू शकत नाही. आज त्याच संविधानाला 75 वर्ष होत आहे. हे संविधान मजबूत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.