Corona Vaccine : कोरोनो लसीमुळे निर्माण झालेली तुमच्या शरीरातील इम्यूनिटी किती दिवस टिकते? भारतातील संस्थांचा महत्वपूर्ण अभ्यास
AGI रुग्णालयाचे प्रमुख डॉ. नागेश्वर रेड्डी या अभ्यासाचा उद्देश हा लसीनंतर शरीरात निर्माण झालेल्या इम्यूनिटीचा परिणाम तपासणे हा होता. तसंच किती जणांना बुस्टर डोसची गरज भागू शकते, याचा अंदाजही या अभ्यासातून घेतला जाणार आहे.
मुंबई : कोरोनाविरोधातील लढाईत कोरोना लस (Corona Vaccine) हेच प्रभावी अस्त्र मानलं जात आहे. अशावेळी कोरोना लस घेतल्यानंतर तुमच्या शरीरात निर्माण झालेली इम्यूनिटी (Immunity) किती दिवस टिकते? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. तर 10 पैकी 3 लोकांमध्ये कोरोना लसीमुळे तयार झालेल्या इम्यूनिटीचा परिणाम 6 महिन्यानंतर संपतो, असा खुलासा भारतातील एका अभ्यासातून समोर आला आहे. याबाबतचे वृत्त ‘आजतक’ने दिले आहे.
हैदराबादेतील AIG रुग्णालय आणि एशियन हेल्थकेअर यांनी मिळून कोरोना लसीच्या इम्यूनिटीबाबत एक अभ्यास केला होता. यात 1 हजार 636 लोकांचा सहभाग होता. या सर्वांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले होते. AGI रुग्णालयाचे प्रमुख डॉ. नागेश्वर रेड्डी या अभ्यासाचा उद्देश हा लसीनंतर शरीरात निर्माण झालेल्या इम्यूनिटीचा परिणाम तपासणे हा होता. तसंच किती जणांना बुस्टर डोसची गरज भागू शकते, याचा अंदाजही या अभ्यासातून घेतला जाणार आहे.
लोकांमधील अॅन्टीबॉडी तपासणीनंतर काय समोर?
या अभ्यासाअंतर्गत लोकांच्यातील कोरोना विरोधातील अॅन्टीबॉडी तपासण्यात आल्या. त्यानुसार ज्या लोकांमध्ये एन्टीबॉडीचा स्तर 15 AU/ml आहे, त्यांची इम्यूनिटी संपली आहे. तर ज्या लोकांमध्ये अॅन्टीबॉडीचा स्तर 100 AU/ml आहे, त्यांच्यात इम्यूनिटी अद्यापही असल्याचं या अभ्यासातून दिसून आलं. शरीरातील अॅन्टीबॉडीचा स्तर 100 AU/ml असायला हवा. हा स्तर एखाद्या व्यक्तीमध्ये कमी असेल तर तो कोरोना संक्रमित होण्याची शक्यता असते, असं डॉ. रेड्डी यांनी सांगितलं.
अभ्यासातील प्रमुख मुद्दे
>> या अभ्यासात सहभागी 1 हजार 636 लोकांपैकी 93 टक्के लोकांनी कोविशिल्ड, 6.2 टक्के लोकांनी कोव्हॅक्सिन तर 1 टक्के लोकांनी स्फुटनिक-व्ही लसीचे डोस घेतलो होते.
>> जवळपास 30 टक्के लोकांमधील इम्यूनिटीचा स्तर 100 AU/ml पेक्षाही कमी झाल्याचं पाहायला मिळालं.
>> डॉ. रेड्डी यांनी सांगितलं की हायपरटेन्शन आणि मधुमेह यासारख्या आजारांनी त्रस्त असलेल्या 40 वर्षांवरील नागरिकांमधील इम्यूनिटी कमी झाली आहे. तसंच 6 टक्के लोकांमध्ये इम्यूनिटी शिल्लकच नसल्याचं ते म्हणाले.
>> या अभ्यासानुसार वृद्धांपेक्षा युवकांमध्ये बराच कालावधीपर्यंत इम्यूनिटी टिकून राहते. तर गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या 40 वर्षावरील नागरिकांमध्ये अॅन्टीबॉडी 6 महिन्यानंतर कमी होतात.
अभ्यासातील तरतुदी काय?
>> कोमॉर्बिडिटी असलेल्या 40 वर्षावरील लोकांना 6 महिन्यानंतर बुस्टर डोस दिला जाऊ शकतो. तसंत दुसरा डोस आणि बुस्टर डोसमधील अंतर 9 महिने ठेवल्यास 70 टक्के लोकांना त्याचा फायदा होतो. त्यांच्यात 6 महिन्यानंतरही इम्यूनिटी टिकून राहते.
>> भारतात 30 टक्के लोक गंभीर आजारांनी त्रस्त आहेत. त्यांच्यात कोरोना लसीच्या दोन डोस घेतल्यानंतरही 6 महिन्यानंतर अॅन्टीबॉडी कमी होतात. त्यामुळे त्यांना बुस्टर डोस देण्याबाबत विचार व्हावा.
इतर बातम्या :