Covid 19 Update : भारतात कोरोना पुन्हा एकदा पाय पसरु लागला आहे. रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 760 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन व्हेरिएंटमुळे सक्रिय रुग्णांची संख्या 4,423 वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत केरळ आणि कर्नाटकमधील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या नवीन प्रकरणे वेगाने वाढत आहेत. कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 च्या आतापर्यंत 541 प्रकरणांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी 5 डिसेंबरपर्यंत, दररोज वाढणाऱ्या रुग्णांची संख्या दुहेरी आकड्यांवर आली होती. पण कोरोनाचा नवा व्हेरिएंट भारतात आल्यानंतर कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वेगाने वाढू लागले आहेत.
याआधी जेव्हा कोरोना विषाणू आपल्या शिखरावर होता, तेव्हा दररोज लाखो रुग्णांची नोंद होत होती. 2020 पासून, भारतात 4.5 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि 5.3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर ही 4.4 कोटी लोकांनी त्यावर मात केली आहे. तर देशात आतापर्यंत कोविड लसींचे 220.67 कोटी डोस देण्यात आले आहेत.