इंडिया आघाडीला पहिला धक्का? शरद पवार यांच्या घरच्या बैठकीला ‘या’ पक्षाची दांडी; दिल्लीत नेमकं काय घडतंय?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची आज बैठक होत आहे. इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची ही बैठक होणार असून या बैठकीसाठी समितीतील 13 पक्षांच्या सदस्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. पण त्यापूर्वीच...
नवी दिल्ली | 13 सप्टेंबर 2023 : इंडिया आघाडीची आज नवी दिल्लीत बैठक होत आहे. इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची ही बैठक होत आहे. समन्वय समितीची ही पहिलीच बैठक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी होणार आहे. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी समन्वय समितीतील सर्व सदस्याांना पाचारण करण्यात आलं आहे. पण बैठकीपूर्वीच इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या बैठकीला आघाडीतील एक पक्ष उपस्थित राहणार नाहीये. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पक्षाच्या गैरहजर राहण्यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी आज संध्याकाळी 4 वाजता इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष अधिवेशनातील रणनीतीबाबतच या बैठकीत चर्चा होणार आहे. जागावाटप बाबतचा निर्णय राज्यस्तरावर घेतला जाणार आहे. गणेश चतुर्थी नंतर इंडिया आघाडीच्या सभा देशभरात घेतल्या जाणार आहेत. इंडिया आघाडीतील पक्षांनी निवडणूक आयोगाकडे नेमक्या कशा भूमिका मांडायच्या याबाबतही चर्चा होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर इंडिया आघाडीतील राजकीय पक्ष निवडणूक आयोगाकडे काही मागण्या करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सीपीएमची दांडी
दरम्यान आजच्या इंडिया आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीला सीपीएम गैरहजर राहणार आहे. या बैठकीला जाणार नसल्याचं सीपीएमने म्हटलं आहे. सीपीएमने इंडिया आघाडीच्या कोणत्याही बैठकीत सामील होण्याबाबतचा कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. सीपीएमची येत्या 16 आणि 17 सप्टेंबर रोजी उच्च स्तरीय पॉलिट ब्यूरोची बैठक होणार आहे. या बैठकीत इंडिया आघाडीच्या कमिट्यांमध्ये जायचे की नाही यावर या निर्णय घेतला जाणार आहे. सीपीएमने याबाबतची माहिती इंडिया आघाडीच्या नेत्यांनाही दिली आहे. मात्र, सीपीआयकडून डी राजा हे या बैठकीत सामील होणार आहेत.
या दोन नेत्यांची गैरहजेरी
या बैठकीला जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह हे सुद्धा गैरहजर राहणार आहेत. त्यांची प्रकृती ठिक नसल्याचं कारण देण्यात आलं आहे. मात्र, त्यांच्या जागी जेडीयूचे नेते आणि बिहार सरकारचे मंत्री संजय कुमार झा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर टीएमसीच्यावतीने अभिषेक बॅनर्जीही बैठकीला जाणार नाहीत. त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावल्याने ते या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.
13 जणांची समिती
मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती. त्यात 13 नेत्यांचा समावेश करण्यात आला होता. महाराष्ट्रातून शरद पवार आणि संजय राऊत यांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही या समितीचे सदस्य आहेत. सर्व राजकीय पक्षांशी समन्वय ठेवून राजकीय रणनीती ठरवण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे.