Cyclone Mocha : मोचा चक्रीवादळाचं संकट, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन
Mocha Cyclone update : भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे की बंगालच्या उपसागरावर तयार झालेले चक्रीवादळ मोचा खूप तीव्र वादळात बदलू शकते.
मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मोचा वादळ तयार झालं आहे. हे वादळ आता उग्र रूप धारण करत करत पुढे सरकत आहे. मोचा वादळ ( Cyclone Mocha ) पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर या आठवड्यातच धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या वादळामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये पुढील तीन दिवसात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. मोचा चक्रीवादळ शुक्रवारी तीव्र रुप धारण करु शकतं असा अंदाज भारतीय हवामान खात्याने सोमवारी वर्तवला आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 130 किलोमीटरपर्यंत असू शकतो.
हवामान खात्याच्या माहितीनुसार आग्नेय बंगालच्या उपसागरावर आणि दक्षिण अंदमान समुद्रालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्यामुळे तेथे वादळ तयार झाले. आता हे वादळ 12 मे च्या सुमारास बांगलादेश आणि म्यानमारच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकांना संभाव्य चक्रीवादळाबद्दल घाबरू नका परंतु कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे.
पर्यटकांसाठी इशारा
मंगळवारपासून लहान सागरी जहाजे आणि मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 8 ते 12 मे दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांजवळील पर्यटन आणि जहाजबांधणीबाबत हवामान खात्याने अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.
मच्छिमारांना सावधानतेचा इशारा
मच्छीमारांना उपसागरात जाऊ नये असे सांगितले गेले आहे. लोकांना किनारपट्टीवर न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आयएमडीचे संचालक महापात्रा म्हणाले, “चक्रीवादळ सुरुवातीला 11 मे पर्यंत मध्य बंगालच्या उपसागराच्या दिशेने उत्तर-वायव्य दिशेने सरकेल आणि नंतर उत्तर-ईशान्य दिशेने बांगलादेश-म्यानमार किनारपट्टीकडे परत येईल. अंदमान आणि निकोबार बेटांवर मंगळवारी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातही पावसाचा इशारा
मोचा चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात ही होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट ओढावलं आहे. पीकांचं यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.