नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. देशातच नव्हे तर परदेशातही राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेन खासदारांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करत राहुल गांधी यांची बाजू घेतली आहे. अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार रो खन्ना यांनी हा निर्णय म्हणजे गांधीवादी दर्शन आणि भारताच्या मूल्यांच्या प्रती असलेला मोठा विश्वासघात असल्याचं म्हटलं आहे.
रो खन्ना हे सिलिकॉन व्हॅलीतून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर रो खन्ना यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे हे गांधी दर्शन आणि भारतीय मूल्यांच्या प्रति असलेला विश्वासघात आहे. या मूल्यांसाठी माझ्या आजोपांनी मोठा त्याग केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तुमच्याकडे अधिकार आहेत. भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी तुम्ही हा निर्णय मागे घ्या, असं खन्ना यांनी म्हटलं आहे. खन्ना यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आवाहन केल्याने केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, खन्ना यांच्या ट्विटवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार कंचन गुप्ता यांची प्रतिक्रिया आली आहे. पंतप्रधानांकडे कायद्याला ओव्हराईड करण्याचे न्यायेत्तर अधिकार नसतात. कोर्टाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. लोकप्रतिनिधी कायद्याच्या अंतर्गत हा निर्णय झाला आहे, असं कंचन गुप्ता यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेच्या इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे उपाध्यक्ष जॉर्ज अब्राहम यांनी राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय हा भारताच्या लोकशाहीसाठीचा दु:खद दिवस असल्याचं मह्टलं आहे. हा भारताच्या लोकशाहीसाठीचा दुर्देवी दिवस आहे. राहुल गांधी यांची सदस्यत्वता रद्द करून मोदी सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सार्वजनिक ठिकाणच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचं हनन करत आहे, असं अब्राहम यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील एका रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. सर्वच चोरांची आडनावे मोदी का असतात असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे गुजरातचे आमदार पूर्णेश मोदी यांनी कोर्टात याचिका दाखल करून मानहानीचा दावा केला होता. या प्रकरणावर चार वर्ष सुनावणी झाली. त्यानंतर सुतर कोर्टाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर संसदेच्या सचिवालयाने राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केलं.