मंगोलियात संरक्षण मंत्र्यांना मिळाली ‘चपळ’ भेटवस्तू, पण भारतात आणणार नाहीत, का?
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सध्या मंगोलिया दौऱ्यावर आहेत. मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेलसुख यांनी त्यांना एक सुरेख, अत्यंत चपळ घोडा भेट म्हणून दिलाय. पण काही कारणांस्तव राजनाथ सिंह हा घोडा भारतात आणू शकणार नाहीत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) सध्या मंगोलिया दौऱ्यावर आहेत. मंगोलियाचे (Mangolia) राष्ट्राध्यक्ष खुरेलसुख यांनी त्यांना एक सुंदर घोटा भेट म्हणून दिलाय. मंगोलियन प्रजातीचा घोडा (Horse) अत्यंत चपळ आणि उत्तम प्रजातीचा समजला जातो. त्यामुळे मोठ्या पदावरील कुणीही व्यक्ती मंगोलियात गेल्यानंतर त्यांना अशा प्रकारचा घोडा भेट म्हणून दिला जातो. मात्र राजनाथ सिंहांना हा घोडा भारतात आणता येणार नाही. पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या एका कायद्यातील अटींमुळे हा घोडा त्यांना भारतात आणता येणार नाही.
2005 मध्ये बनलेल्या कायद्यानुसार, प्राण्यांना भेट म्हणून देणे-घेण्यास मनाई आहे. मग मंगोलियन प्रजातीच्या या घोड्याचं काय होणार, असा प्रश्न उपस्थित होतोय.
कायद्यानुसार हा घोडा भारतात आणता येणार नाही. पण तिथेच भारतीय दूतावासात तो ठेवला जाईल. यापूर्वीही असे करण्यात आले आहे. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगोलियाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनाही असा घोडा मिळाला. मात्र नियमानुसार, तो तिथेच भारतीय दूतावासात ठेवण्यात आला.
मध्य आशियात या प्रजातीचे घोडे 10 हजार वर्षांपूर्वीपासून आढळतात, असे म्हटले जाते. मात्र मंगोलियात 4 हजार वर्षांपासून हे घोडे पाळले जातात.
अशा प्रकारचे घोडे पाळणे आणि त्यांचा व्यापार मंगोलियात मोठ्या प्रमाणावर वाढतोय. 2020 मध्ये येथील लोकसंख्या 33 लाख होती. तर मंगोल प्रजातीचे घोडे 30 लाख एवढे होते.
मंगोल प्रजातीचे घोडे पाळणं इथं समृद्धीचं लक्षण मानलं जातं. त्यामुळेच उच्च पदस्थ व्यक्तींना हे घोडे भेट दिले जातात.
मंगोलियाच्या अर्थव्यवस्थेत घोडा व्यापार आणि घोडा पालनाचं मोठं योगदान आहे. निर्यातीतही त्यांची मोठी भूमिका आहे.
मंगोलियातून इतर देशांना निर्यात होणाऱ्या 5 महत्त्वाच्या वस्तूंमध्ये घोड्यांचा समावेश आहे. तशी आकडेवारीही उपलब्ध आहे.
2020 मध्ये मंगोलियाने एकूण 1865 कोटी रुपये किंमतीचे घोड्यांचे केस आणि 263 कोटी रुपये किंमतीचे घोड्याचे मांस निर्यात केले.
मंगोलियात जवळपास प्रत्येक घरात याच प्रजातीच्या घोड्याचे मांस आणि दूध वापरलं जातं.