बहिणीच्या डोक्यावर अक्षता पडण्याआधीच भावाची निघाली अंत्ययात्रा, मन सुन्न करणारी घटना
सिलेंडरचा स्फोट झाला. काही मिनिटात आग इतकी पसरली की, काय होतय ते लोकांनाच समजलं नाही. क्षणार्धात सगळ जळून खाक झालं. फॅक्टरीत जे खुर्चीवर बसलेले, ते बसल्याजागी जळाले असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
नवी दिल्ली : एप्रिल महिन्यात शुभमच्या बहिणीच लग्न होतं. पण घरात बहिणीच्या डोक्यावर अक्षता पडण्याआधीच शुभमची अंत्ययात्रा निघाली. घरात बहिणीच्या लग्नाची तयारी सुरु असताना भावाच्या अशा अकाली मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. गुरुवारी संध्याकाळी उत्तर दिल्लीच्या अलीपूरमध्ये एका पेंट फॅक्टरीला भीषण आग लागली. या आगीत 11 मजुरांचा जळून मृत्यू झाला. यात शुभम सुद्धा होता. यूपीच्या गोंडा, बिहार आणि दिल्लीतील काही लोक या पेंट फॅक्टरीमध्ये नोकरी करायचे. गोंडाच्या एकाच गावातील अनेक लोक या फॅक्टरीमध्ये नोकरीला होते.
गोंडा गावचा 19 वर्षीय शुभम याच फॅक्टरीमध्ये नोकरी करायचा. अलीपूर गावात शुभम संयुक्त कुटुंबात रहायचा. शुभमच संपूर्ण कुटुंब फॅक्टरीसमोर बसून रडत होतं. फक्त एकदा त्याला पाहू दे अशीच या कुटुंबाची आर्त हाक होती.
मी पळत-पळत आलो, तो पर्यंत जळून सर्व खाक झालेलं
गोंडाचे बृज लाल सुद्धा याच फॅक्टरीमध्ये नोकरी करायचे. “माझी तब्येत खराब होती, पण कोणीतरी मला सांगितलं की, फॅक्टरीमध्ये आग लागलीय. मी पळत-पळत इथे आलो. तो पर्यंत जळून सर्व खाक झालं होतं. माझ्या भावाच काय झालं? हे समजत नाहीय. कोणीच काही सांगत नाहीय” फॅक्टरीमध्ये कुठलीही अग्निरोधक यंत्रणा नव्हती, असं मृतकांच्या कुटुंबीयांच म्हणणं आहे. मजुरांना सेफ्टी जॅकेट सुद्धा दिले जात नव्हते. घरातून जे कपडे घालून यायचे, त्यावरच ते काम करायचे.
खुर्चीवर बसल्याजागी जळाले
फॅक्टरी रहिवाशी भागात होती. त्यामुळे इथे राहणाऱ्या लोकांच भरपूर नुकसान झालय. घरातील सर्व सामान जळून खाक झालय. फॅक्टरीत पेंट बनवण्यासाठी केमिकलचा वापर व्हायचा. केमिकलने पेट घेताच पिंप फुटू लागली. सिलेंडरचा स्फोट झाला. काही मिनिटात आग इतकी पसरली की, काय होतय ते लोकांनाच समजलं नाही. क्षणार्धात सगळ जळून खाक झालं. फॅक्टरीत जे खुर्चीवर बसलेले, ते बसल्याजागी जळाले असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.