दिल्लीत आपचा पराभव झाला आहे. अरविंद केजरीवाल यांची गेल्या 10 वर्षाची सत्ता गेली असून भाजपला तब्बल 25 वर्षानंतर सत्ता मिळाली आहे. आपच्या या पराभवामुळे इंडिया आघाडीत चांगलीच खळबळ उडाली आहे. काँग्रेसने आपसोबत निवडणुकीत युती केली नाही. त्यामुळेच आपला सत्तेतून बाहेर जावं लागल्याची टीका आता इंडिया आघाडीतून केली जात आहे. नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. महाभारताचा एक व्हिडीओ ट्विट करून त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांचे कल हाती आले आहेत. या कलानुसार भाजप 40 तर आम आदमी पार्टी 30 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसने खातंही उघडलेलं नाही. हा कल हाती येताच उमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. एवढेच नव्हे तर आपलाही त्यांनी कानपिचक्या दिल्या आहेत.
मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महाभारत मालिकेतील एक व्हिडीओ शेअर करून संताप व्यक्त केला आहे. अजून लढा आपआपसात…असं त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून म्हटलं आहे. दिल्लीतील निवडणुकीच्या अनुषंगानेच त्यांनी हा व्हिडीओ शेअर करून आप आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आप आणि काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून त्यांनी हा हल्ला चढवला आहे.
Aur lado aapas mein!!! https://t.co/f3wbM1DYxk pic.twitter.com/8Yu9WK4k0c
— Omar Abdullah (@OmarAbdullah) February 8, 2025
काँग्रेस आणि आप दोन्ही इंडिया आघाडीचे घटक आहेत. पण विधानसभा निवडणुकीत दोघांचीही चाल वेगळी होती. या आधी हरियाणातही काँग्रेस आणि आपने स्वबळावर निवडणुका लढवल्या. तिथेही दोघांनी एकमेकांची मते खाल्ल्याने भाजप सत्तेत आली. आताही दिल्लीत दोघे स्वबळावर लढले. काँग्रेसने आपची मते खाल्ली त्यामुळेच आपला सत्तेतून बाहेर जावं लागलं आहे. तर भाजपला मोदी केंद्राच्या सत्तेत आल्यानंतर तब्बल 10 वर्षानंतर दिल्ली जिंकता आली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. मतदानानंतर संध्याकाळी एक्झिट पोल आले होते. एक दोन एजन्सी वगळता सर्वांनीच दिल्लीत भाजपचं सरकार येणार असल्याचं म्हटलं होतं. तर आपला यावेळी सत्तेतून बाहेर जावं लागणार असल्याचंही म्हटलं होतं. एक्झिट पोलचे हे दावे आता खरे ठरताना दिसत आहे.