शेतकऱ्यांचा आसूड कडाडला, चिल्ला बॉर्डरवर 45 हजार शेतकरी एकवटले, संसदेकडे कूच करणार; 5 मागण्या कोणत्या?
शेतकऱ्यांनी सरकार विरोधात बंडाचा झेंडा उगारला आहे. दिल्लीच्या चिल्ला बॉर्डवर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. दिल्लीच नव्हे तर केरळ, उत्तराखंड आणि तामिळनाडूतही शेतकरी विधानसभेला घेराव घालणार आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, पेन्शन, वीज दर कमी करणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे. त्याशिवाय लखीमपूर खीरी हिंसेत ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा आसूड कडाडला आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या बॅनरखाली सुमारे 45 हजार शेतकरी दिल्लीच्या चिल्ला बॉर्डवर एकवटले आहेत. या शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन तेज केलं आहे. हजारो शेतकरी नोएडाच्या महामाया फ्लायओव्हरपासून दिल्लीकडे कूच करणार आहेत. गोरखपूरसारखी चारपट भरपाई, भूमी अधिग्रहण कायद्याचा लाभ आणि 10 टक्के विकसित भूखंड आदी मागण्या लागू करण्यासाठी शेतकरी पेटून उठले आहेत. शेतकरी आधी चार दिवस यमुना प्राधिकरण कार्यालयाच्या समोर चार दिवस धरणे आंदोलन देणार आहेत. त्यानंतर हे शेतकरी संसदेकडे कूच करणार आहेत. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे शेतकरी संसदेला घेराव घालण्याच्या तयारीत आहेत.
गौतम बुद्ध नगरमधील शेतकऱ्यांना गोरखपूर हायवे परियोजनाच्या नुसार चारपट भरपाई दिली गेली नाही, असा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. त्याशिवाय 10 वर्षांपासून सर्कल रेटमध्येही वाढ करण्यात आलेली नाही. नवीन भूमी अधिग्रहण कायद्याचा लाभ आणि हायपॉवर कमिटीच्या शिफारशी लागू केल्या पाहिजे, आदी मागण्या शेतकरी करत आहेत. रविवारी पोलीस आणि प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्या फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत.
वाहतूक बदल
नोएडा पोलिसांनी शेतकऱ्यांच्या मार्चच्या पार्श्वभूमीवर वाहतूक बदलाचा प्लान लागू केला आहे. यमुना एक्सप्रेस वे आणि नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेवर अवजड वाहनांना बंदी घातली आहे. सिरसा ते परी चौक मार्गे सुरजपूर जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक रोखून धरण्यात आली आहे. या मार्गावरून जाणाऱ्यांना दुसऱ्या मार्गाने प्रवास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली आणि एनसीआरमध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे.
मागण्या काय?
भूमी अधिग्रहणाचा लाभ मिळावा
पिकांना किमान किमान आधारभूत किंमत (एमएसपी)ची हमी
शेतकऱ्यांच्या थकीत रकमेवर तोडगा
गोरखपूर हायवे परियोजनाच्या नुसार चारपट भरपाई द्यावी
सर्कल रेटमध्येही वाढ करण्यात यावी
दोन राज्यांचे पोलीस अलर्ट
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडा आणि दिल्ली पोलीस अलर्ट झाली आहे. दिल्ली बॉर्डरवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बॉर्डवर असंख्य बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. शेतकरी नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. नोएडाच्या लगतच्या सर्व बॉर्डवर बॅरेकेटिंग लावण्यता आली आहे. नागरिकांना मेट्रोतूनच प्रवास करण्यास सांगितलं गेलं आहे.